Breaking

Shashikant Khedekar : माजी आमदार म्हणतात, आत्मपरिक्षण करणार

Dr. Shashikant Khedekar is finding it difficult to digest defeat : डॉ. खेडेकरांना बोचतोय पराभव; विकासकामे करूनही पराभव

Buldhana विकासकामे करून, जनसंपर्क वाढवूनही काहीच हाती आले नाही, याचं शल्य माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांना बोचत आहे. त्यामुळे त्यांनी आता आत्मपरिक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात दहा वर्षांत जी विकासकामे केली, ती कोणीही केली नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

मतदारसंघात माझ्याएवढा जनसंपर्क कुणाचाच नाही. तरीही पराभव झाला. याची कारणे शोधण्यासाठी जनसंपर्क अभियान सुरू केले आहे, असंही खेडेकर म्हणाले आहेत. साखरखेर्डा येथील जगदंबा माता मंदिरात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात शिवसेना पक्षबांधणीसाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

Raksha Khadse : आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तम पायाभूत सुविधा निर्माण केल्या

या अभियानादरम्यान मतदारसंघातील शिवसेनेने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांवर आणि झालेल्या विकासकामांवरही डॉ. खेडेकर यांनी प्रकाश टाकला. “आमदार असताना साखरखेर्डा येथे ग्रामीण रुग्णालयासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि आज ते काम पूर्ण झाले आहे. रखडलेली पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी भरघोस निधी मंजूर केला, भोगावती नदीवर सात ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधले, तसेच रस्त्यांची मोठी कामे केली,” असे त्यांनी सांगितले.

साखरखेर्ड्यातील नागरिकांनी सलग दोन निवडणुकांत मोठ्या मताधिक्याने निवडून दिले, मात्र इतर गावांमध्ये अपेक्षेप्रमाणे मतदान झाले नाही. “मी मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामे केली, तरीही काही भागांत मला मतदान कमी मिळाले. हे समजून घेण्यासाठी आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी जनसंपर्क अभियान राबवले जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना सभासद नोंदणीसाठी सुरू असलेल्या मोहिमेसोबतच मतदारांच्या भेटी घेताना पराभवाची कारणे समजून घेण्यावरही भर दिला जात आहे. “नेमकं माझं काय चुकलं, हे जाणून घेण्यासाठीच हा जनसंपर्क आहे,” असे डॉ. खेडेकर यांनी स्पष्ट केले.

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांचे दमदार भाषण, खेळाडुंमध्ये भरला जोश !

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष जिवणसिंग राजपूत होते. यावेळी माजी समाजकल्याण सभापती आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी, ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे, तालुका युवासेना प्रमुख संदीप मगर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

मतदारसंघातील राजकीय गणित समजून घेण्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी योग्य दिशा ठरवण्यासाठी जनसंपर्क अभियान उपयुक्त ठरेल, असा विश्वास शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे. डॉ. खेडेकर यांचे हे अभियान पक्षसंघटन बळकट करण्यासोबतच मतदारांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.