Congress-facing-opposition-in-own-house : भाजपचे संख्याबळ भारी; अर्थसंकल्पालाही मान्यता नाही, विकासकामे रखडली
Shegao शेगाव नगर परिषदेत सत्तेचा ताबा काँग्रेसकडे असला, तरी सभागृहातील संख्याबळ भाजपकडे असल्याने नगराध्यक्षांसमोर मोठी राजकीय कोंडी निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष काँग्रेसचे असले तरी बहुमत भाजपकडे असल्याने पालिकेतील निर्णयप्रक्रिया ठप्प झाली असून, नगराध्यक्षांना जणू “आपल्याच घरात विरोधाचा सामना” करावा लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
नगरपालिकेत प्रशासक राज संपून निवडून आलेल्या प्रतिनिधींचे शासन सुरू झाले असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. जनतेने नगराध्यक्षपदी काँग्रेसचे प्रकाश शेगोकार यांना निवडून दिले; मात्र सभागृहात भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने नगराध्यक्षांकडून मांडल्या जाणाऱ्या अनेक प्रस्तावांना विरोध होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी शहरातील अनेक विकासकामे रखडल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
Water crisis : खामगाव पालिकेत एमआयएमचे ‘पुंगी बजाओ’; पाणी-स्वच्छतेच्या प्रश्नावर संताप
अर्थसंकल्पालाही विरोध; सभागृहात तणाव
शेगाव नगरपालिकेत एकूण ३० सदस्य असून त्यापैकी १७ सदस्य भाजपचे, तर काँग्रेसकडे अधिकृतरित्या फक्त पाच सदस्य आहेत. अशा परिस्थितीत नगराध्यक्षांकडून मांडल्या जाणाऱ्या ठरावांना विरोध होत असल्याने प्रशासनावर प्रभाव पडत नसल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत झालेल्या सर्वसाधारण सभेत तसेच स्थायी समितीच्या बैठकीत नगराध्यक्षांनी मांडलेल्या अनेक विषयांना विरोध करण्यात आला. इतकेच नव्हे तर पालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पालाही मान्यता मिळाली नाही, त्यामुळे येत्या काळात सभागृहात आणखी राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विकासकामे ठप्प; नागरिकांमध्ये नाराजी
नगरपालिका निवडणुकीला दोन महिने उलटून गेले असतानाही शहरात ठोस विकासकामे सुरू झाल्याचे दिसत नाही. विशेषतः प्रभाग क्रमांक ७ मधील शांतीनगर, आझादनगर, मुस्लिम सोसायटी, बुरजेनगर, सहारानगर आणि न्यू आझाद नगर या भागांत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
निवडणुकीनंतर एकदाच सफाई मोहीम राबवून फोटोसेशन करण्यात आले; मात्र त्यानंतर त्या भागात सफाई कर्मचारीही फिरकले नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
रस्ते खोदले, कामे अर्धवट
पाणीपुरवठा पाइपलाइनसाठी रस्ते खोदून ठेवण्यात आले; मात्र वर्ष उलटूनही रस्ते पूर्ववत करण्यात आलेले नाहीत. कंत्राटदार कंपनीला वारंवार सांगूनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्थानिक नगरसेवकांनी हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला; मात्र केवळ आश्वासनांपलीकडे काहीच होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
Vishwas patil : ‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक
‘फोटोसेशन’पुरतेच काम?
दरम्यान, शहरात ठोस कामे न होता फोटोपुरती कामे करून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार वाढला, अशीही टीका होत आहे. एखाद्या नाल्याची साफसफाई किंवा लहानसहान कामांवर फोटोसेशन करून ते सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
संख्याबळाच्या राजकारणात विकास बळी?
पालिकेत काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याने कंत्राटदार किंवा प्रशासनावर त्यांचा प्रभाव पडत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे शहरातील विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या दुय्यम ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Anil Deshmukh : नागपूरला स्फोटांची राजधानी करायची आहे का? अनिल देशमुखांचा सरकारला सवाल
नव्याने विकसित होत असलेल्या वस्त्यांमध्ये विकास व्हावा म्हणून नागरिकांनी नगरसेवक निवडून दिले; मात्र पालिकेतील राजकीय गणितांमुळे विकासाऐवजी संघर्षच अधिक दिसत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.








