Government Accused of Manipulating Figures in the Name of Relief : सरकारविरोधात एल्गार, मदतीच्या शासन निर्णयाची केली होळी
Buldhana राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी आकड्यांच्या खेळात गुंतवणाऱ्या सरकारचा निषेध करत शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मदत पॅकेजच्या शासन निर्णयाची होळी केली. जून ते सप्टेंबर २०२५ या काळातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले ३१,६२८ कोटींचे मदत पॅकेज हे केवळ फसवणुकीचा डाव असून, प्रचारापुरते आकडे मांडले गेले आहेत, असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला.
संघटनेच्या मते, सरकारने दिलेली मदत म्हणजे ‘मदत’ नव्हे तर ‘मस्करी’ आहे. कोरडवाहू पिकांसाठीची मदत ५,१०० रुपयांवर आणली, बागायती पिकांसाठी केवळ ३,५०० रुपये तर विहीर दुरुस्तीसाठीची मदतही मोठ्या प्रमाणात घटवली. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी हे आकडे केवळ माध्यमांपुरते असल्याचा आरोप संघटनेने केला.
Sanjay Gaikwad : निवडणूक आयाेगाचा मनमानी कारभार, कुणाचेही नियंत्रण नाही
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, स्वभाप जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, कार्यकारी अध्यक्ष विनायक वाघ, आणि युवा आघाडी अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात यांनी केले. शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा ‘उणे सबसिडी’चा मूलभूत मुद्दा पुढे आणला. शासनाच्या किंमत नियंत्रण धोरणामुळे शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे लूट झाली असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. “ही लूट थांबवून ‘लूटवापसी’ करा,” अशी मागणी करत संघटनेने सरकारकडे प्रति एकर ५०,००० रुपये किंवा प्रति हेक्टर १,५०,००० रुपयांच्या ‘लुटीच्या परतफेडीची किस्त’ देण्याची मागणी केली आहे.
Municipal Corporation Elections : महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची जम्बो कार्यकारिणी !
अर्थशास्त्र आणि न्याय यांचा आधार नसलेल्या या शासन निर्णयाच्या निषेधार्थ राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णयांची होळी करण्यात आली. शेतकऱ्यांचा वाढता रोष आणि संघटनांचा एल्गार पाहता, आगामी काळात हा मुद्दा राजकीयदृष्ट्या तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








