Politics over a marriage hall on an open plot : बुलढाण्यात शिंदे सेना-भाजप आमनेसामने; अतिक्रमण झाल्याचा आरोप
Buldhana शहरातील विष्णूवाडी येथे उभारण्यात आलेले राजे मंगल कार्यालय हे खुल्या भूखंडावर अनधिकृतपणे बांधले असल्याचा गंभीर आरोप शिंदे सेनेने केला आहे. तसेच या बेकायदेशीर अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिंदे सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यामुळे महायुतीतील भाजप व शिंदे सेना पक्ष आमनेसामोर आले आहेत.
शिंदे सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित भूखंड विकास योजनेत ‘सुविधा क्षेत्र’ म्हणून दर्शविण्यात आलेला आहे. त्यावर व्यावसायिक वापरासाठी उभारलेले बांधकाम नियमबाह्य आहे. या जागेच्या मूळ मालकाला याआधीच ताबा देण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, नगर परिषदेने त्या जागेवर बोगस गुंठेवारी करून बांधकामास परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गुंठेवारी कायदा केवळ निवासी क्षेत्रांसाठी लागू आहे. व्यावसायिक वापरासाठी त्याची अंमलबजावणी करता येत नाही. तरीदेखील नियम धाब्यावर बसवत बेकायदेशीर गुंठेवारी आदेश व बांधकाम परवानगी देण्यात आली, असा आरोप शिंदे सेनेने केला आहे. यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांनी ही परवानगी रद्द केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Neelam Gorhe : उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या बॉडीगार्डकडून आमदाराला धक्काबुक्की !
शहरातील नागरिकांसाठी राखीव असलेली जागा व्यापून उभे करण्यात आलेले हे मंगल कार्यालय बेकायदेशीर आहे. प्रशासनाने त्वरित अतिक्रमण हटवावे, अन्यथा शिंदे सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या निवेदनावर जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, युवासेना प्रमुख श्रीकांत गायकवाड, संजय हाडे, दीपक सोनुने, मनोज यादव, विजय कोल्हे, अरुण ढोरे, सुरेश सरकटे, नंदकिशोर जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. निवेदन देताना शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.