Shiv Sena symbol : “…म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!” शिवसेना पक्ष–चिन्ह प्रकरणावर पुन्हा आक्षेप

Sanjay Raut anger over retweeting Eknath Shinde photo with Chief Justice : एकनाथ शिंदेंचा सरन्यायाधीशांसोबतचा फोटो रीट्वीट करत संजय राऊतांचा संताप

Mumbai : शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात तीन वर्षांपासून प्रलंबित असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि त्यावरून नवा राजकीय वाद पेटला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हेच फोटो रीट्वीट करत केवळ एका ओळीतून तीव्र संताप व्यक्त केला असून न्यायप्रक्रियेतील विलंबावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत हे विशेष कार्यक्रमासाठी मुंबईत दाखल झाले होते. मुंबई विमानतळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर उपस्थित होते. या स्वागताचे फोटो शिंदे यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शेअर करत याबाबत माहिती दिली.

ZP Election : मोठी उलथापालथ : ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, दोन्ही राष्ट्रवादीचीही साथ !

याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंची ही पोस्ट थेट रीट्वीट करत “…म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!” अशी एक ओळ जोडली. अवघ्या या एका वाक्यातून राऊतांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीतील विलंबावर नाराजी व्यक्त केली आहे. तीन वर्षांपासून निकाल का लागत नाही, असा सूचक प्रश्न उपस्थित करत त्यांनी न्यायव्यवस्थेतील प्रक्रियेवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले आहे.

शिवसेना फुटीनंतर पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंबंधीचे प्रकरणही न्यायालयात प्रलंबित आहे. या आठवड्यात या दोन्ही प्रकरणांवर सुनावणी होणार होती, मात्र ती पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे गटामध्ये नाराजीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव सेनेकडून न्यायव्यवस्थेतील विलंबावर सातत्याने टीका करण्यात येत आहे.

21 जानेवारी रोजी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकांवर सुनावणी होणार होती. मात्र सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून येत्या चार आठवड्यांत या प्रकरणांवर सुनावणी घेण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तरीही वारंवार तारखांवर तारखा मिळत असल्याने उद्धव सेनेचा संताप वाढताना दिसत आहे.

Ladki Bahin Yojana : एका कॉलवर तक्रारींचे निरसन करण्यासाठी 181 हेल्पलाईन सुरू !

एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारकडून घटनात्मक पदांचा सन्मान असल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे संजय राऊत यांच्या एका ओळीतील टोमण्याने राजकीय वातावरण तापले आहे. ही केवळ एक प्रतिक्रिया नसून शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निकालासाठी सुरू असलेल्या दीर्घ प्रतीक्षेचा उद्रेक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आता येत्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.