Anil Parab walked out of Matoshree in anger : अनिल परब तावातावाने बाहेर पडल्याने वातावरण तापलं
Mumbai रविवारी मध्यरात्री मातोश्रीवर महानाट्य घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उबाठा नेते अनिल परब अचानक बैठक सोडून बाहेर पडल्याने खळबळ उडाली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपासाठी रविवारी रात्री ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत आमदार अनिल परब आणि युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याची माहिती समोर येत आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत जागावाटपाच्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र वाद झाला. उमेदवारांच्या नावांवरून मतभेद इतके वाढले की अनिल परब संतापून बैठक सोडून निघून गेले, अशी माहिती समोर येत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड आणि जागावाटप यावरून तणाव वाढला आहे. रविवारी रात्री मातोश्रीवर झालेल्या बैठकीत अनिल परब आणि युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्यातील वाद टोकाला गेला. उमेदवाराच्या नावावरून झालेल्या या वादामुळे वातावरण तापले. परब यांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला तिकीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे वरुण सरदेसाई यांनी युवासेनेच्या उमेदवाराला संधी देण्याचा आग्रह धरला.
कोणाच्या उमेदवारीवरुन झाला वाद?
हा वाद वॉर्ड क्र. ९५ वरुन झाला आहे. वरुण सरदेसाई हे श्रीकांत सरमळकर यांचे जावई आदिक शास्त्री यांच्या नावासाठी आग्रही होते. मात्र अनिल परब यांना त्यांचे व इश्वासू सेखर वैंगणकर यांचं नाव पुढे करायचं होतं. मात्र वरुण सरदेसाई यांनी ऐनवेळी हा मुद्दा उपस्थित केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हा वाद इतका वाढला की परब यांनी नाराजी व्यक्त करत बैठक सोडून निघावं लागलं.
या वादामुळे बैठकीत उपस्थित इतर नेत्यांमध्येही तणाव निर्माण झाला. परब यांनी तडकाफडकी बैठक सोडल्याने शिवसेनेतील अंतर्गत मतभेद उघडकीस आले. शिवसेनेत गेल्या काही महिन्यांपासून उमेदवार निवडीवरून मतभेद असल्याचे बोलले जात होते. मात्र आता मातोश्रीवरच वाद झाल्याने पक्षातील गटबाजी उघड झाली आहे. अनिल परब हे अनुभवी नेते असून पक्षनिष्ठेमुळे त्यांना महत्त्व दिले जाते. तर वरुण सरदेसाई हे युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी असून ठाकरे कुटुंबाचे नातेवाईकही आहेत. दोन्ही नेते ठाकरेंच्या जवळचे मानले जातात. मात्र उद्धव ठाकरे कोणाच्या बाजुने कल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








