Shocking exploits of fake IAS woman, many leaders in the net : बनावट आयएएस महिलेचे चक्रावणारे कारनामे, अनेक नेते जाळ्यात
Chhatrapati Sambhaji Nagar : संपूर्ण राज्याला हादरा देणाऱ्या बनावट आयएएस कल्पना भागवत प्रकरणात धक्कादायक आणि नव्या घडामोडी समोर येत आहेत. पद्मश्री पुरस्कार मिळवून देण्याचे तसेच राजकीय नेत्यांना राज्यसभेत पाठवण्याचे आश्वासन देत कल्पना भागवतने मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करून अनेकांना चुना लावल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर, अमरावती, हिंगोली आणि अहमदनगर जिल्ह्यांतील अनेक नेत्यांना पद्मश्री देण्याचे लोभस आश्वासन देऊन लाखो रुपये उकळल्याचा संशय अधिक दृढ झाला आहे. याशिवाय नागपूरमधील एका नामांकित नेत्याला राज्यसभेची ऑफर देऊन पैसे उकळल्याचेही उघड झाले आहे. या कारवायांमध्ये डिंपी हरजाई नावाचा व्यक्ती कल्पना भागवतसोबत कार्यरत होता. डिंपी पूर्वी दिल्लीतील एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याचा ड्रायव्हर राहिला असून त्यानेही पद्मश्री आणि राज्यसभेची ‘डील’ लावून देण्याचे आश्वासन देत त्याच पद्धतीने पैसे घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
पोलीस तपासात कल्पना भागवतच्या संपर्कात असलेल्या 28 जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू पठाण यांचाही यात समावेश आहे. सिडको पोलिसांनी पठाण यांचा जबाब नोंदवून घेतला असून घटनाक्रम किती खोलवर आहे याचे संकेत त्यातून मिळत आहेत. आणखी धक्कादायक बाब म्हणजे कल्पना भागवतकडे केंद्रातील ऊर्जा खात्यातील सचिव असल्याचे भासवणारे बनावट पत्र देखील पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे तिने केवळ स्थानिक स्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील ओळख निर्माण केल्याचा आव आणून फसवणूक केली असण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे.
पोलिस तपासात कल्पना भागवत सातत्याने जयपूर आणि दिल्लीला प्रवास करत असल्याचे उघड झाले असून दिल्लीतील पॉवर मंत्रालय, गृह खात्यातील अधिकाऱ्यांशी परिचय असल्याचा दावा ती अनेकांपुढे करत होती. व्हिसा मिळवून देणे, मोठे ट्रान्सफर करवून देणे आणि सर्वोत्तम आयएएस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ती असल्याची प्रमाणपत्रे दाखवत ती विश्वास संपादन करत होती.
पुण्यातील एका माजी कुलगुरूकडून सन्मान मिळाल्याचा दावा असलेले ‘बेस्ट आयएएस आणि सामाजिक काम’ सर्टिफिकेट खरे की बनावट याचा तपास सुरू आहे. याशिवाय ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे आणि तिचा साथीदार अफगाणिस्तानचा असून सध्या तपास त्याच्या कुटुंबाच्या पाकिस्तानातील नात्यांपर्यंत पोहोचला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा व्याप केवळ राज्यापुरता नसून आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोलीस तपास ओढवू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
ZP election 2025 : आरक्षण मर्यादा ओलांडल्याने झेडपी इलेक्शन दोन टप्प्यात?
बनावट IAS म्हणून स्वतःची प्रतिमा उभी करत कल्पना भागवत सहा महिन्यांपासून प्रति दिवस सुमारे सात हजार रुपये भाड्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आईसोबत वास्तव्यास होती. या काळात तिने अनेक राजकीय वजनदार व्यक्ती, उच्चभ्रू व्यावसायिक आणि शासकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या लोकांना भेटल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या हाती मिळणाऱ्या प्रत्येक नवीन पुराव्यामुळे या प्रकरणातील रहस्य अधिकच गडद होत असून कल्पना भागवत आणि तिच्या साथीदारांनी किती लोकांना आणि किती प्रमाणात आर्थिक फटका दिला याचे संपूर्ण चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. प्रकरणाचा तपास अत्यंत जलद गतीने सुरू असून पुढील काही दिवसांत मोठे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








