Solapur Municipal Election : भाजपकडून सन्मानजनक जागा न मिळाल्याने शिंदे गटाची राष्ट्रवादीशी युती

Direct confrontation with Mahavikas Aghadi : जागावाटप जाहीर महाविकास आघाडीशी थेट सामना

Solapur : राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना सोलापुरात मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. भाजपकडून अपेक्षित व सन्मानजनक जागा न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपपासून दूर जात थेट अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या युतीनुसार सोलापूर महापालिकेच्या एकूण १०२ जागांपैकी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी ५१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत.

सोलापूर महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये गेले काही दिवस जागावाटपावरून चर्चा सुरू होत्या. मात्र या चर्चा पुढे सरकू शकल्या नाहीत. शिवसेना शिंदे गटाने भाजपकडे ४२ जागांची मागणी केली होती, मात्र भाजपकडून केवळ ८ जागांची ऑफर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर शिवसेनेने ३० जागांचा फेरप्रस्ताव दिला, तरीही त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर भाजपसोबतची चर्चा थांबवत शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोर्चा वळवला.

Municipal election : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठी राजकीय घडामोड

 

राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात युतीबाबत चर्चा झाली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोलापूर दौऱ्यानंतर या हालचालींना वेग आला आणि अखेर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती निश्चित झाली. यासंदर्भात आज दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक पार पडली असून पत्रकार परिषदेतून युतीची अधिकृत माहिती देण्यात आली.

यावेळी बोलताना सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सोलापूर महापालिकेसाठी युती झाली असून ५०-५० टक्के जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. महापालिकेच्या १०२ जागांपैकी प्रत्येकी ५१ जागा लढवण्यात येतील. सोलापूर महापालिकेत महापौर आमचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातही दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असून नगरविकास व अर्थ खाते आमच्या नेत्यांकडे असल्याने त्याचा उपयोग करून सोलापूरचा मोठा विकास साधला जाईल, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, सोलापुरातील राजकीय चित्र अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती निश्चित झालेली असताना दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आपले जागावाटप जाहीर केले आहे. सोलापूर महापालिकेच्या १०२ जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ४५ जागांवर, शिवसेना उद्धव ठाकरे गट ३० जागांवर, राष्ट्रवादी शरद पवार गट २० जागांवर आणि माकप ७ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरात आता शिवसेना शिंदे गट–राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे.

Municipal election : उमेदवारी अर्जासाठी दोनच दिवस उरले तरी युती-आघाडीचा तिढा कायम

याचदरम्यान काँग्रेसलाही सोलापुरात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील प्रभाग क्रमांक १६ मधील अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी आणि निरीक्षक अन्वर सादात यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. फिरदोस पटेल या खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय मानल्या जात होत्या आणि २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या.

उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एकूणच सोलापुरात युती, आघाडी आणि पक्षांतरांच्या घडामोडींमुळे महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार झाली असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे राजकीय धक्के आणि उलथापालथी पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

__