Shinde–Thackeray groups join hands to stop the BJP : पक्षश्रेष्ठींचे आदेश बाजूला, भाजपला रोखण्यासाठी मोहिते-पाटील आणि अभिजीत पाटलांचा नवा प्रयोग
Solapur “एकवेळ भाजपमध्ये जाऊ, पण शिंदेंसोबत जाणार नाही,” अशी आक्रमक प्रतिज्ञा करणाऱ्या संजय राऊत यांच्या राजकीय भूमिकेला सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे झेंडे आणि वरिष्ठ नेत्यांमधील टोकाचे वैर बाजूला ठेवून, स्थानिक पातळीवर भाजपचा प्रभाव रोखण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सर्व विभाजित गट एकत्र येताना दिसत आहेत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील ही नवी समीकरणे जिल्ह्याच्या राजकारणात ‘बार्शी पॅटर्न’ची पुनरावृत्ती मानली जात आहेत.
काही दिवसांपूर्वी बार्शीमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांनी (शिंदे आणि ठाकरे) भाजपविरोधात एकत्र येऊन सर्वांना चकित केले होते. आता तोच प्रयोग माढ्यात राबवला जात आहे. जेव्हा स्थानिक अस्तित्वाचा प्रश्न येतो, तेव्हा मुंबईतील नेत्यांचे आदेश गौण ठरतात, हेच यातून स्पष्ट होते. भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे धास्तावलेले इतर गट आता आपसातील मतभेद विसरून ‘समान शत्रू’ विरुद्ध एकवटले आहेत.
माढ्यातील हे समीकरण अत्यंत गुंतागुंतीचे आणि रंजक आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे गट. शरद पवार आणि अजित पवार यांचे गट. राज्याच्या स्तरावर हे चारही गट एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. मात्र, माढ्यात भाजपच्या पॅनेलला पराभूत करण्यासाठी हे चौघेही एकाच छताखाली येताना दिसत आहेत. हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे यश मानले जात आहे.
विजयसिंह मोहिते पाटील यांची या युतीला लाभलेली उपस्थिती बरंच काही सांगून जाते. रांझणी येथून सुरू होणारा हा प्रचार केवळ स्थानिक निवडणुकीपुरता मर्यादित नसून, सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या वर्चस्वाला दिलेले हे थेट आव्हान आहे. अभिजित पाटील यांच्यासारख्या तरुण नेत्याला सोबत घेऊन मोहिते-पाटलांनी जिल्ह्याची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेण्याची तयारी केली आहे.
Republic Day Program : असे कसे सरकार? प्रजासत्ताक दिनालाच मंत्र्यांची पाठ!
संजय राऊत किंवा इतर बडे नेते मुंबईतून कितीही आक्रमक विधाने करत असले, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ची भीती वाटते. भाजपला रोखण्यासाठी ‘विभाजित मते’ एकत्र करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे या नेत्यांना उमजले आहे. यामुळेच सोलापुरात पक्षीय सीमा धूसर झाल्या असून, “पक्षापेक्षा स्थानिक सत्ता महत्त्वाची” हा मंत्र जपला जात आहे.








