MPSC delays in declaring results of Clerk-Typist exam : भविष्यावर अनिश्चिततेचे सावट
Buldhana : सन २०२३ मध्ये लिपिक – टंकलेखक पदांसाठी एमपीएससीमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल लावण्यामध्ये आयोगाने कमालिचा विलंब केला आहे. अद्यापही या परीक्षेचा अंतिम निकाल जाहिर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. प्रामाणिकपणे मेहनत करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार, असा निर्धार शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केला आहे.
यासंदर्भात जयश्री शेळके यांनी माध्यमांना सांगितले की, राज्य सरकारने आणि आयोगाने विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये. हे विद्यार्थी केवळ सरकारी नोकरीसाठी नव्हे तर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भविष्यातील निर्धारणासाठी झगडत आहेत. त्यांच्या संघर्षाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. निकाल जाहीर होईपर्यंत आम्ही हा संघर्ष थांबवणार नाही.
परीक्षा दिलेल्या काही विद्यार्थ्यांनी शिवसेनेच्या बुलढाणा संपर्क कार्यालयात जयश्री शेळके यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. आयोगाने यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागणार असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले होते. मात्र आता हा निकाल जून अखेरीस लागेल, असे सांगण्यात आले आहे. आयोग विद्यार्थ्यांना तारखांवर तारखा देत आहे. ही विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा असल्याचे जनमत तयार झाले आहे.
patole vs Fadnavis : फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये : पटोले
शेळके यांनी पुढाकार घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद झाला आहे. त्यांच्या संघर्षाला एक नवीन आवाज मिळाला आहे. आता दिलेल्या मुदतीत निकाल लागतो की आणखी पुढची तारीख दिली जाते, याकडे राज्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे.