Ali confidence restored after difficult surgery initiative of Sudhir Mungantiwar : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अवघड शस्त्रक्रियेनंतर अलीचा आत्मविश्वास पुन्हा उभा राहिला
Chandrapur : जन्मजात गहन श्रवणबाधा असतानाही जिद्द, चिकाटी आणि संवेदनशील नेतृत्वाच्या पाठबळावर चंद्रपूरच्या अली मुहम्मद रियाझखान घौरी या विशेष बालकाने अखिल भारतीय स्तरावर प्रेरणादायी यश संपादन केले आहे. गुजरातच्या पोरबंदर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय ५ कि.मी. सागरी जलतरण स्पर्धेत अलीने द्वितीय क्रमांक मिळवत चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विशेष म्हणजे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून काही महिन्यांपूर्वी या बालकावर कोक्लिअर प्रोसेसर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर अलीच्या आत्मविश्वासाला भरारी मिळाली आणि आता त्याने आपली क्षमता सिद्ध केली.
अली हा द्विपक्षीय कोक्लिअर इम्प्लांट केलेला विशेष बालक आहे. सन २०२३ मध्ये त्याच्या एका साऊंड प्रोसेसरमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याने तो पूर्णपणे बंद पडला होता. इयत्ता १० वीच्या महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यावर असताना एका प्रोसेसरवर शिक्षण, दैनंदिन जीवन आणि क्रीडा सराव करणे अलीसाठी अत्यंत कठीण झाले. साऊंड प्रोसेसरची किंमत लाखोंमध्ये असल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते.
शासकीय योजनांमध्ये कोक्लिअर इम्प्लांटनंतर पुन्हा साऊंड प्रोसेसर देण्याची तरतूद नसतानाही, ही बाब मानवीय आणि अपवादात्मक असल्याचे ओळखून आ. सुधीर मुनगंटीवार यांनी खनिज निधी अंतर्गत विशेष बाब म्हणून सुमारे सात लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिला. या निधीतून अलीसाठी नवीन साऊंड प्रोसेसर उपलब्ध झाला आणि त्याचे थांबलेले आयुष्य पुन्हा गतीमान झाले.
या मोलाच्या मदतीमुळे अलीने यशस्वीरित्या इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण केली. हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवत त्याने पोहण्याच्या सरावाला नवे बळ दिले आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर ४ जानेवारी रोजी पोरबंदर येथे झालेल्या समुद्री पोहणे स्पर्धेत देशभरातील स्पर्धकांना मागे टाकत द्वितीय क्रमांक पटकावला.
Khamgao Municipal Council : खामगाव पालिकेत भाजपचा दबदबा; चारही जागांवर भाजपचाच शिक्का
शासनाच्या नियमांच्या चौकटीपलीकडे जाऊन मानवीय दृष्टिकोनातून दिलेली ही मदत केवळ आर्थिक नव्हे, तर एका विशेष बालकाच्या जीवनाला नवी दिशा देणारी ठरली आहे. अलीच्या या यशामुळे चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढला असून आ. सुधीर मुनगंटीवार यांची संवेदनशील नेतृत्व समाजात किती मोठा सकारात्मक बदल घडवू शकते, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.








