Clear instructions to Chandrapur District Magistrate: BJP workers will also go to the spot : भाजप कार्यकर्त्यांनाही घटनास्थळी जाण्याच्या सुचना
Chandrapur : वैनगंगा नदीला आलेल्या पुराने चंद्रपूर जि्ल्ह्याच्या पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव व लगतच्या परिसरामध्ये पुराने थैमान घातले आहे. पुरामुळे अनेकांच्या घरांचे, वाहनांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासकीय मदत लवकरात लवकर पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सुचना राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी दिलेले आहेत. पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्यासही त्यांनी सांगितले आहे. आमदार मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी आज (१० जुलै) स्वतः जुनगाव व लगतच्या गावांमध्ये पोहोचले. आज ते पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत.
सद्यस्थितीत मुंबई येथे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन संपल्यानंतर आमदार मुनगंटीवार स्वतः जुनगाव येथे भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून ठोस निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अशा संकटकाळात नुकसानग्रस्त लोकांना दिलासा देणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. असे सांगत आमदार मुनगंटीवार यांनी भाजप पदाधिकाऱ्यांनाही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नागरिकांना काय लागेल ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाशी समन्वय ठेऊन मदतीसाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी कार्यकर्त्यांना सुचवले आहे.