Breaking

Sudhir Mungantiwar : केवळ भाषणांनी महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत !

 

Speeches alone will not solve women’s problems : महिलांच्या अत्याचारात वाढ होत असेल तर आपणच दुर्दैवी आहोत

Nagpur : राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी विधानसभेतील २१ महिला आमदारांची एक उच्चस्तरिय समिती स्थापन करावी. तसेच येत्या सोमवारी मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात महिलांच्या सबलीकरणासाठी जेंडर बजेटची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

जागतिक महिला दिनानिमित्ताने मांडण्यात आलेल्या ठरावावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध सूचना केल्या. माणसांच्या आयुष्यात महिलांचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे सांगून ते म्हणाले, जन्म देणारी, अर्धांगिनी पत्नी व पालकत्व देणाऱ्या कन्येने आयुष्य समृद्ध होते. परंतु केवळ भाषणांनी महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत असताना आपण महिलांचे गुणगान करायचे, हा विरोधाभास आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ असे आपण म्हणतो. मात्र त्याचवेळी महिलांच्या अत्याचारात वाढ होत असेल तर आपणच खरे दुर्दैवी आहोत, अशी खंत आ मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Sudhir Mungantiwar : औरंगजेबच्या उदात्तीकरणावर मुनगंटीवार आक्रमक

विधानसभेतील भाषणाने सध्याच्या स्थितीत बदल होणार नाही. स्त्री-पुरुष समानात हा केवळ पुस्तकात लिहिण्याचा विषय आहे. महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी विधिमंडळाने २१ महिला आमदारांची एक उच्च स्तरिय समिती स्थापन करावी. सामाजिक विकासासाठी कोणत्या तरतुदी आवश्यक आहेत, याबद्दलच्या सूचना देण्याचे काम ही समिती करेल. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक सबलीकरणाची आवश्यकता आहे. या समितीने दिलेल्या अहवालावर पुढील पावसाळी अधिवेशनात निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांचे दमदार भाषण, खेळाडुंमध्ये भरला जोश !

महामार्गांवर शौचालये नाहीत. २७ हजारांवर शाळांमध्ये शौचालये नाहीत. यामुळे महिलांची, मुलींची कुचंबणा होते. यावर तातडीने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. महिलांची प्रतिष्ठा जपण्यासाठी काटेकोर कायदे करण्याची आवश्यकता आहे, असंही ते म्हणाले. त्याचवेळी एआयच्या AI माध्यमातून छायाचित्रे मॉर्फ करून महिलांचा छळ सुरू असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.

महिला कर्मचारी असल्यास अनेक सुविधा द्याव्या लागतात. त्यामुळे अनेक उद्योगांमध्ये महिलांना नोकरी दिली जात नाही. कामाच्या ठिकाणी हा भेद केला जातो. हा सामाजिक बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कायदे करताना त्यावरसुद्धा अधिक चिंतन करण्याची आवश्यकता आहे. एक मिशन म्हणून आपण काम केले पाहिजे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा दिला जात आहे. मात्र, राज्यात आजही १ कोटी ७५ निरक्षर आहेत आणि यात महिलांची संख्या अधिक आहे, याकडेही मुनगंटीवारांनी सभागृहाचं लक्ष वेधलं.

Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवारांनी मार्कंड्याचा साखरी घाटाचा रस्ता केला सोपा !

काही आमदारांनी लाडकी बहिण योजनेमधून महिलांची नावे कपात करू नये, अशी सूचना केली आहे. परंतु श्रीमंत महिलांना कशाला दीड हजार रुपये द्यायचे? मर्सिडीजमधून फिरणाऱ्या महिलांचे अनुदान बंद केले तर यात चूक नाही. त्याऐवजी या शिल्लक रकमेतून अंगणवाडी व महिलांसाठी शौचालये बांधावी, अशी सूचनाही त्यांनी केली. या सर्वांसाठी येत्या सोमवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद होण्याची आवश्यकता आहे. हा अर्थसंकल्प ‘जेंडर बजेट’ म्हणून ओळखला गेला पाहिजे. महिलांच्या योजनांवर अधिकाधिक तरतूद झाली पाहिजे, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली.