There were 32 years of barefoot work for the Ram temple and now it will be for the Mungantiwar : राम मंदिरासाठी होते ३२ वर्ष अनवाणी, अन् आता मुनगंटीवारांसाठी राहणार
Ram Temple : अयोध्येत राम मंदिर व्हावे, यासाठी कारसेवकांनी जिवाची बाजी लावली. वर्षानूवर्षे त्यासाठी लढा दिला. अखेर केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात राम मंदिर निर्माणाचे काम गतीमान झाले. राम मंदिरासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीच्या एका रामभक्ताने अनोखा संकल्प सोडला होता. जोपर्यंत अयोध्येत भव्य राम मंदिर होत नाही, तोपर्यंत मी पादत्राणे घालणार नाही, असा हा संकल्प होता आणि हा दृढ संकल्प करणाऱ्या रामभक्ताचे नाव आहे चंद्रकांत गुंडावार.
६ डिसेंबर १९९२ या कारसेवेच्या दिवशी चंद्रकांत गुंडावार यांनी महासंकल्प सोडला होता. आपली ही प्रतीज्ञा त्यांनी ३२ वर्ष जपली. सोमवारी २० जानेवारी २०२५ ला त्यांचा महासंकल्प पूर्ण होणार होता. काल ते चप्पल घालणार होते. यासाठी त्यांनी स्व. नीळकंठराव गुंडावार यांच्या जयंती समारोहाच्या दिवसाचे औचित्य साधले होते. काल या समारोहात चंद्रकांत गुंडावार चप्पल घालतील, हे पाहण्याची आतुरता उपस्थितांमध्ये होती. तो क्षण जवळ आला, पण याच वेळी चंद्रकांत यांनी पुन्हा एक संकल्प सोडला, तो त्यांचे राजकारणातील आदर्श राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि बल्लारपूरचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी.
Sudhir Mungantiwar : चर्चा नव्हे कृती ! कापडी पिशव्या वाटून दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश
सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी गुंडावार यांनी ३२ वर्षांनंतर चप्पल घालता घालता पुन्हा सोडली. यावेळी त्यांनी पुन्हा एक भीष्मप्रतिज्ञा घेतली. ‘जोपर्यंत राजकारणातील माझे गुरू, माझे आदर्श सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद किंवा मोठे पद मिळत नाही, तोपर्यंत मी अनवाणीच राहील’, अशी घोषणा गुंडावार यांनी कालच्या समारोहात केली. या कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार उद्घाटक आणि सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते.
चंद्रकांत गुंडावार यांनी घोषणा करताच आमदार मुनगंटीवार यांनी त्यांना थांबवले. असला संकल्प करू नका, म्हणून विनंती केली. त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण ‘सुधीरभाऊ, तुमचे कार्य बघता मंत्रिपद किंवा त्यासारखेच मोठे पद तुम्हाला मिळायला हवे. ती तुमची पात्रता आहे. कृपा करून मला थांबवू नका. जोवर तुम्हाला मंत्रिपद किंवा एखादे मोठे पद मिळणार नाही, तोवर मी चप्पल घालणार नाही’, असे म्हणत गुंडावार यांनी मुनगंटीवार यांनाच थांबवले. मग मुनगंटीवार यांचाही नाईलाज झाला.
चंद्रकांत गुंडावार हे भद्रावतीमधील लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष आहेत. या मंडळाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. संस्थेची स्थापना करणारे स्व. नीळकंठराव गुंडावार यांचा जयंती समारोह काल सोमवारी साजरा करण्यात येत होता. याच वेळी चंद्रकांत यांनी हा नवीन संकल्प सोडला. ३२ वर्षांनंतर गुंडावार चप्पल घालणार होते, पण नव्या संकल्पामुळे ते राहून गेले. त्यामुळे उपस्थितांनी हळहळही व्यक्त केली. त्यांचा हा संकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी प्रार्थना उपस्थित प्रत्येकाने केली.