Fund of 1 crore 56 lakhs, success due to consistent pursuit of MLA Sudhir Mungantiwar : १ कोटी ५६ लक्षचा निधी मंजूर, मुनगंटीवारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
Chandrapur : पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा गाव १०० टक्के सौरग्राम म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चिंतलधाबा सौरग्राम प्रकल्पासाठी १ कोटी ५६ लक्ष ४० हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या आत गावकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करत आ. मुनगंटीवार यांनी हा निधी मंजूर करून घेतल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
चिंतलधाबा गावाला पूर्णतः सौरऊर्जेवर आधारित करण्यासाठी प्रत्येक घरावर सौर पॅनल बसविण्यात येणार आहेत. यासाठी मंजूर झालेल्या निधीमुळे गावातील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असून, ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने गावाची भक्कम वाटचाल सुरू होणार आहे. चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी या निधीस प्रशासकीय मान्यता दिली असून, त्यामुळे प्रकल्प प्रत्यक्ष साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Maharashtra politics : निर्णय राष्ट्रवादीचा, पण आधी आमच्याशी चर्चा आवश्यक
या प्रकल्पामुळे ग्रामीण भागात स्वच्छ, शाश्वत आणि किफायतशीर ऊर्जेचा वापर वाढणार आहे. सौरऊर्जेमुळे गावकऱ्यांचे वीजबिल कमी होणार असून, पर्यावरणपूरक ऊर्जेचा लाभही मिळणार आहे. चिंतलधाबा गाव राज्याच्या ऊर्जा स्वावलंबनाचे आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्र सौरऊर्जेत राज्यात अग्रस्थानी राहावे, या उद्दिष्टाने आमदार सुधीर मुनगंटीवार सातत्याने प्रयत्न करत आहेत. यापूर्वी मुल तालुक्यातील उथळपेठ गाव १०० टक्के सौरग्राम म्हणून विकसित करण्यात आले आहे. त्यानंतर आता चिंतलधाबा गावाचा या योजनेत समावेश झाल्याने बल्लारपूर विधानसभेत ऊर्जा स्वावलंबनाचा आदर्श अधिक बळकट होत आहे.
५ डिसेंबर २०२५ रोजी चिंतलधाबा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात आ. मुनगंटीवार यांनी गावातील वीज समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून १०० टक्के सौरग्राम करण्याचा निर्धार जाहीर केला होता. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात आला. अवघ्या दोन महिन्यांत निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ऊर्जा स्वावलंबन, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांना वीजबिलातून दिलासा देण्याचा संकल्प देशभर राबवला जात आहे. याच दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून प्रेरणा घेत चिंतलधाबा गाव महाराष्ट्रातील आदर्श १०० टक्के सौरग्राम म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.








