Police thanked MLA Sudhir Mungantiwar, while Mungantiwar thanked Chief Minister Devendra Fadnavis : पोलिसांनी मानले आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार तर मुनगंटीवारांनी दिले मुख्यमंत्र्यांना धन्यवाद
Chandrapur : राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. राज्याचे माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण आणि ठाम पाठपुराव्यामुळे शासनाने डीजे लोन योजनेसाठी तब्बल एक हजार ७६८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पाच हजार ४५९ पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे पोलीस दलात समाधान आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शासनाच्या मंजुरीअभावी ही योजना ठप्प पडली होती. ऑगस्ट २०२३ पासून राज्यातील चार हजार ७११ पोलिसांनी आणि बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातील ७४८ कर्मचाऱ्यांनी डीजी लोनसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र निधी उपलब्ध नसल्याने कोणत्याच अर्जाला मंजुरी मिळाली नव्हती. या परिस्थितीची गंभीर दखल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आणि विधानसभेत हा प्रश्न लावून धरला. त्यानंतरही शासनाकडे सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि गृह विभागाने निधीला हिरवा कंदील दाखवला.
डीजी लोन (पोलीस गृह बांधणी कर्ज) अग्रीम योजना ही पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेत अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या मूळ वेतनाच्या १२५ टक्के इतके गृह कर्ज थेट पोलीस विभागाकडून मिळते. ज्या कर्मचाऱ्यांकडे स्वतःचे निवासस्थान नाही, अशांना या योजनेतून घर बांधण्याची संधी मिळते. या निर्णयानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मनस्वी आभार मानले. त्यांच्या संवेदनशीलतेचा आणि शासनाशी असलेल्या परिणामकारक संवादाचा गौरव केला. राज्यभरातून येणाऱ्या प्रतिसादावरून आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना मोठा जनाधार मिळाल्याचे चित्र आज तयार झाले आहे.
Koregaon land scam in Pune : ‘आधी लूट आणि मग कायदेशीर सूट’ राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्ला !
स्वतः आमदार मुनगंटीवार यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस दलाच्या प्रश्नाला संवेदनशीलतेने हाताळले. पोलीस हे राज्याच्या सुरक्षेचा कणा आहेत आणि त्यांना हक्काचे घर मिळणे, ही केवळ प्रशासकीय नव्हे, तर मानवी जबाबदारीसुद्धा आहे. दोन वर्षांचा अडथळा दूर होऊन पोलीस दलासाठी गृह कर्ज योजना पुन्हा सुरू झाल्याने अनेक अंमलदारांच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागले आहे. या निर्णयाने पोलिसांना केवळ आर्थिक दिलासाच मिळाला नाही, तर शासन आणि पोलीस दलातील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले, अशी प्रतिक्रिया आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.








