
sunetra-pawar-guardian-minister-beed-pune-government-order : बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपवले
Mumbai: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडत असून, सुनेत्रा पवार यांच्याकडे सातत्याने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर बीड आणि पुणे या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला असून, दोन्ही जिल्ह्यांचा कारभार आता सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे.
याआधी बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे होते. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्या नंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते. त्या वेळी ही जबाबदारी कोणाकडे जाणार, याबाबत मोठी चर्चा झाली होती. मात्र अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वतःकडेच ठेवले होते. पुण्याचे पालकमंत्रिपदही तेच सांभाळत होते. त्यांच्या निधनानंतर ही दोन्ही महत्त्वाची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद अद्याप रिक्त आहे. या पदावर कोणाची नियुक्ती होणार, याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे. यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांची या पदावर निवड झाल्याचे सांगितले जात होते. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी हे दावे फेटाळून लावत, अद्याप कोणाचीही राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच आपण या शर्यतीत नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात अस्थिरतेचे वातावरण आहे. राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जाणार, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या जागेवर लोकसभेत कोणाची नियुक्ती होणार, तसेच राष्ट्रवादीच्या दोन गटांचे विलीनीकरण होणार का, असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांच्यावर बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनाच राष्ट्रवादीचे नेतृत्व का दिले, शपथविधी घाईत का झाला?
दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद आपण स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर, सुनेत्रा पवार यांनीच हे पद स्वतःकडे घ्यावे, यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून आग्रह धरला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्रिपद, दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आणि संभाव्य पक्ष नेतृत्व या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
___








