Rauts sharp counterattack on Fadnavis : राऊतांचा फडणवीसांवर रोखठोक पलटवार
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्याच् खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद उभा राहिला आहे. “मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला अडचण काय आहे? आम्ही आमच्या पैशाने खातो, आम्ही कोणाचे मिंधे नाही” असे सुळे यांनी दिंडोरीतील कार्यक्रमात स्पष्ट सांगितले होते. या विधानावरून भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी संप्रदाय सुळेंना उत्तर देईल असे म्हटले, तर भाजपच्या तुषार भोसले यांनी “वारकरी परंपरेचा अपमान” म्हणून सुळेंना चांगलाच धारेवर धरले.
मात्र या सर्व टीकेवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर तीव्र हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्रात मटण खायला बंदी आहे का? तुम्ही कोणाला काय खायचं हे ठरवणार कोण? आम्ही काय खातो ते आमच्या पैशाने खातो. फडणवीस काय खातात हे आम्हाला माहित नाही का? ते खरोखर शाकाहारी आहेत का? कशाला खाण्यापिण्यावर जाता? मटण-चिकन महाग झालंय कारण जे कालपर्यंत खात नव्हते तेच आता रांग लावून उभे राहतात,” असा थेट पलटवार राऊतांनी फडणवीसांवर केला.
दरम्यान, या वादाला क्रिकेटचा संदर्भही जोडला गेला आहे. पाकिस्तानविरुद्ध भारताने खेळावे की नाही यावरून झालेल्या वादात फडणवीसांनी “जावेद मियाँदाद मातोश्रीवर आले होते” अशी टीका ठाकरे गटावर केली. यावर संतप्त प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत, भाजपचा सगळाच कारभार अर्धवट ज्ञानावर चालतो. त्यांच्या गुडघ्यातही मेंदू नाही.
दिलीप वेंगसरकर जावेद मियाँदादला घेऊन मातोश्रीवर आले होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्याच्या तोंडावर सांगितलं – दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही. पाकिस्तान रक्त सांडत असताना क्रिकेटला परवानगी नाही. चहा प्या आणि निघून जा असं बाळासाहेबांनी सांगितलं.”
राऊतांनी यावेळी मोदींवरही अप्रत्यक्ष प्रहार केला. “बाळासाहेबांनी पाकिस्तानसमोर कधीच शेपूट घातलं नाही. मिस्टर फडणवीस, तुमच्या नरेंद्र मोदींसारखं त्यांनी कधीही झुकून घेतलं नाही. रक्त आणि पाणी एकत्र चालत नाही, हेच ठाकरे घराण्याचे तत्व आहे,” असं ते म्हणाले.
Ladki Bahin Scheme : जिल्हा परिषदेच्या १९९ महिला कर्मचारी ‘लाडकी बहीण’ ठरल्या अपात्र!
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने सुरू झालेला वाद आता भाजप-शिवसेना संघर्षाचा नवा मुद्दा ठरला असून, फडणवीसांच्या वक्तव्यांवर राऊतांनी केलेल्या जोरदार पलटवारामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.