supriya-sule-reaction-on-rohit-pawar-allegations-ajit-pawar-plane-accident : सुप्रिया सुळेंचा चौकशीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांवर विश्वास
New Delhi : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळात संशय आणि आरोपांची मालिका सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या मृत्यूबाबत रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आश्वासन दिल्याचे सांगत संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
रोहित पवार यांनी अजित पवारांचा मूळ प्रवासाचा आराखडा कारने जाण्याचा असताना अचानक विमान प्रवासाचे नियोजन का करण्यात आले, पायलट ऐनवेळी का बदलले गेले, तसेच संबंधित विमान कंपनीला मेंटेनन्स सर्टिफिकेट कोणी दिले आणि तपास अहवाल अद्याप का जाहीर करण्यात आलेला नाही, असे गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगू या आणि अधिकृत निष्कर्षाची प्रतीक्षा करू या. रोहित पवारांची अस्वस्थता स्वाभाविक असून त्यांनी प्रश्न पारदर्शकपणे मांडले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
Sanjay Raut : “नीट धोतर नेसता येत नाही आणि आम्हाला अक्कल शिकवतो”
रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत पूर्व विदर्भातील एका नेत्याचे नाव घेतल्याचा उल्लेख करत त्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. त्यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
कौटुंबिक भावनिक स्थितीबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सुनेत्रा वहिनींवर नवीन जबाबदारी आली आहे, त्याचा आनंद आहे; मात्र अजितदादा नसल्याचे दुःखही मनात आहे. एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद अशी आमची अवस्था आहे. अजितदादा नसण्याची पोकळी कधीच भरून निघणार नाही आणि आजही ते आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतही त्यांनी माहिती दिली. त्यांची तब्येत चांगली असून लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो, असे सुळे म्हणाल्या. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. तसेच शरद पवार रुग्णालयात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोनवरून प्रकृतीची विचारपूस केल्याचे सांगत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, अजित पवारांच्या दुर्घटनेबाबत सखोल चौकशीची मागणी जोर धरत असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेनंतर तपासाच्या निष्कर्षाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.








