The rapist was hiding in the sugarcane field : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
Pune स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरुर तालुक्यातील गुणाट गावात उसाच्या शेतात आरोपी लपून बसला होता. पुणे पोलिसांची १३ पथके आरोपीच्या शोधात होती. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. सोमवारी पहाटे साडेपाच वाजता तो स्वारगेट बसस्थानकावर उभा होता. त्यावेळी फलटणच्या बसची वाट बघणाऱ्या मुलीला त्याने बहाण्याने एकांतात नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. राज्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला.
बलात्कार करून दत्तात्रय गाडे फरार झाला होता. तीन दिवस त्याचा शोध घेण्यात गेले. पण अखेर तो त्याच्या जन्मगावी म्हणजेच शिरुर तालुक्यातील गुणाट येथे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे गावकऱ्यांनीच ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक गुणाटच्या दिशेने नघाले.
गावाचा कोपरा न् कोपरा शोधूनही तो सापडला नाही. याशिवाय ड्रोनद्वारे देखील शोध घेण्याचा प्रयत्न झाला. अखेर गुरुवारी मध्यरात्री दत्तात्रय गाडे उसाच्या शेतात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला अटक करून पुण्यात आणले आहे. या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे.