Tension increased after the video went viral on social media : गोंदियात संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
Gondia शहरातील गणेशनगर परिसरात धार्मिक भावना दुखावणाऱ्या प्रकारामुळे बुधवारी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. एका व्यापाऱ्याने आपल्या दुकानात थोर महापुरुषांचे व पवित्र श्रद्धास्थानांचे छायाचित्र असलेल्या टाईल्स लावल्याचा प्रकार समोर आल्यावर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. या टाईल्सवरून ये-जा करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण पेटले.
गणेशनगरातील संबंधित दुकानात थोर व्यक्तींच्या प्रतिमांचे टाईल्स लावण्यात आले होते. या टाईल्सवरून लोक चालत होते, जे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावणारे ठरले. हे दृश्य एका युवकाच्या लक्षात येताच त्याने व्यापाऱ्याला हे टाईल्स काढण्यास सांगितले. मात्र व्यापाऱ्याने दुर्लक्ष केल्याने संतप्त युवकाने संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर टाकला. काही क्षणांतच व्हिडीओ व्हायरल झाला आणि नागरिकांच्या भावना चाळवून गेल्या.
Ajit Pawar : बाजार समितीच्या सभापतींनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ!
सकाळपासूनच गणेशनगर परिसरात शेकडो नागरिक जमा होऊ लागले. त्यांनी संबंधित व्यापाऱ्याच्या दुकानात धडक देत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. व्यापाऱ्याला चोप देत त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी सुरू झाली. काही वेळातच जमाव शहर पोलिस ठाण्यावर मोर्चा घेऊन गेला आणि आरोपीवर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची जोरदार मागणी केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, सहाय्यक पोलिस निरीक्षक व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यावर तातडीने पोहोचत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अक्षय चन्नावार, गेडाम, डोंगरवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गणेशनगर गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी शहर पोलिसांनी तत्काळ दखल घेत संबंधित व्यापाऱ्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पोलिसांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले असून, कायदा हातात घेणाऱ्यांवरही योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
सध्या शहरात वातावरण स्थिर असले तरी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेने धार्मिक सहिष्णुतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.