Spontaneous response to ‘Amravati Bandh’, traders kept shops closed : राजकमल ते जिल्हा कचेरीदरम्यान निषेध मोर्चा, मृतांना सामूहिक श्रद्धांजली
Amravati जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवार, २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू संघटनांतर्फे अमरावती बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला व्यापाऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी तीन वाजेपर्यंत शहरातील मुख्य बाजारपेठा बंद राहिल्या. तसेच राजकमल चौक ते जिल्हा कचेरीदरम्यान मोटारसायकल रॅली काढून निषेध मोर्चा काढण्यात आला.
या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात तीव्र संतापाचे वातावरण होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर विविध हिंदू संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. त्याला व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक आणि नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
शुक्रवारी नेहमीच शहरातील बाजारपेठा गजबजलेल्या असतात. मात्र बंदच्या आवाहनामुळे राजकमल चौक, गांधी चौक, श्याम चौक, कॉटन मार्केट, इतवारा बाजार, गाडगेनगर, पंचवटी चौक, रुक्मिणीनगर, बसस्थानक परिसर आदी भागांतील सर्वच दुकाने बंद होती. शहरातील बहुतांश आस्थापना दुपारी ३ वाजेपर्यंत कुलूपबंद होत्या.
Terrorist attack in Pahalgam : काळी फित बांधून भ्याड हल्ल्याचा निषेध!
यामुळे शहरात एक प्रकारचा शांततेचा आणि निषेधाचा संदेश पोहोचला. शासकीय व प्रशासकीय कार्यालये सुरु असल्याने काही प्रमाणात नागरिकांची वर्दळ होती, मात्र व्यापारी व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते.
सामूहिक श्रद्धांजली आणि हनुमान चालिसा पठण
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सकल हिंदू संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजकमल चौकात एकत्र जमले होते. यावेळी लष्कर-ए-तोयबा व ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
Jammu Kashmir terrorist attack : आतापर्यंत ५०० पर्यटक दाखल, अमरावती, अकोल्यातील पर्यटक आज येणार !
मृतांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि उपस्थितांनी हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करून त्यांना आदरांजली वाहिली. या वेळी उपस्थितांमध्ये शक्ती महाराज (महाकाली माता शक्तिपीठ), विजय खडसे (सह मंत्री, विश्व हिंदू परिषद), अनिल साहू, बंटी पारवानी, बादल कुलकर्णी, सुधीर बोपुलकर, निषाद जोध, कंवल पांडे, मुन्ना मालवीय, प्रदीप सोलंकी, नीलेश टवरारे आदींचा समावेश होता.
मोटारसायकल रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधले
दहशतवाद्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत राजकमल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले. रॅलीचे जिल्हा कचेरीवर आगमन होताच शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन सादर केले.
Terrorist attack in Kashmir : उरी, पठाणकोट, पुलवामा अन् आता पहलगाम.. इंटलिजन्स करतेय तरी काय ?
यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली. दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने थेट कारवाई करावी, असा आग्रह धरण्यात आला. यावेळी संगम गुप्ता, सूरज घारू, प्रीती मिश्रा, प्यारे मोहन विश्वकर्मा, पवन श्रीवास्तव, दुर्गेश सोलंके, राखी गुप्ता, शालू विश्वकर्मा, अनिकेत पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त
बंद आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभाग सतर्क होता. महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी सहकार्य केले.