Tripti desai ons neelam gorhe : नीलम गोऱ्हे यांच्यावरील तृप्ती देसाईंच्या गंभीर आरोपाने खळबळ !

tripti-desai-allegations-neelam-gorhe-ashok-kharat-controversy-maharashtra : अशोक खरातशी संबंध, एक्सप्रेस-इन हॉटेल भेटी आणि आमदारकीसाठी संपर्काचा दावा

Pune : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे आधीच राज्यात खळबळ उडालेली असताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात यांच्यातील कथित संबंध, भेटीगाठी आणि आमदारकीसाठी संपर्क झाल्याचा दावा करत अनेक प्रश्न उपस्थित केले.

तृप्ती देसाई यांनी आरोप करताना सांगितले की, नीलम गोऱ्हे या गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अशोक खरात यांच्या संपर्कात होत्या आणि विधान परिषद आमदारकीसाठी त्या त्यांना भेटत असत. नाशिकमधील एक्सप्रेस-इन हॉटेलमध्ये तसेच पाथर्डी परिसरातील ठिकाणी दोघांची भेट झाल्याचा दावा त्यांनी केला. या भेटी केवळ ओळखीपुरत्या नव्हत्या, तर त्यामागे काही आर्थिक व्यवहार किंवा इतर कारणे होती का, याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Mehkar Politics : आजी-माजी आमदारांमध्ये वाद चिघळला; हाणामारीपर्यंत पोहोचले मेहकरचे राजकारण

देसाई यांनी पुढे सांगितले की, नीलम गोऱ्हे यांच्यासोबत अशोक खरात यांना भेटायला गेलेल्या व्यक्तींनी स्वतः येऊन त्यांना माहिती दिली आहे. गरज पडल्यास त्या व्यक्तींनाही समोर आणण्याची तयारी असल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रूपाली चाकणकर यांच्यावर ज्या प्रकारे कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर नीलम गोऱ्हे यांच्याविरोधातही चौकशी व्हावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली. तसेच या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून करण्यात यावी आणि संभाव्य आर्थिक देवाणघेवाणीचाही तपास व्हावा, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करत १ एप्रिलपर्यंत त्याला पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याचा निर्णय दिला आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणूक अशा गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून तपासादरम्यान नव्या पीडित महिलाही समोर येत आहेत.

विशेष तपास पथकाने आता खरातशी संबंधित संस्थांवरही लक्ष केंद्रीत केले असून ‘शिवनिका’ संस्थेचे व्यवहार तपासाच्या कक्षेत आले आहेत. या संदर्भात रुपाली चाकणकर आणि इतर ट्रस्टींनाही समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह वक्तव्य, शिवसेनेची कारवाईची मागणी

तृप्ती देसाई यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, महिलांच्या लैंगिक शोषणासारख्या गंभीर प्रकरणात नेहमी सक्रिय भूमिका घेणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात आतापर्यंत मौन का बाळगले, हा प्रश्न उपस्थित होतो. मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आणि तक्रारी समोर येऊनही त्यांनी प्रतिक्रिया दिली नसल्यामुळे संशय अधिक गडद होत असल्याची टीका त्यांनी केली. या सर्व आरोपांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आता नीलम गोऱ्हे यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.