Shiv Sena’s ‘Janakrosh Morcha’ in Buldhana on August 11 : ११ ऑगस्टला बुलढाण्यात ‘जनआक्रोश मोर्चा’, बैठकीत निर्णय
Buldhana शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सामान्य जनतेच्या अडचणी जैसे थे असताना, महायुती सरकारच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करून तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांचा विक्रम गाठून जनतेच्या रोषाला आमंत्रण दिले आहे. अशा कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी जोमाने पुढे सरकत असून, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष राज्यभर ‘जनआक्रोश आंदोलन’ उभारणार आहे.
बुलढाण्यातील मोर्चा ११ ऑगस्ट रोजी होणार असून, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व जिल्हा समन्वयक गजानन वाघ यांनी केले आहे. मेहकर येथे पार पडलेल्या नियोजन बैठकीत आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
Devendra Fadnavis : काय सांगता! ‘देवाभाऊ’च्या नावाने चक्क पतसंस्था?
यावेळी बुधवत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढत असून, पीककर्जाबाबत सरकारने फक्त आश्वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने सत्तेत आल्यानंतर महायुती सरकार विसरले आहे. पीक विम्यापासून शेतकरी वंचित आहेत, तर ‘लाडकी बहिण’ योजनेतील लाभ कमी करून लाखो महिलांना यातून वगळण्यात आले आहे.
बुधवत यांनी आरोप केला की, शेतकऱ्यांबाबत बेताल वक्तव्य करणारे कृषिमंत्री आणि भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांत अडकलेले इतर मंत्री यांना सत्ताधाऱ्यांकडून पाठीशी घालण्यात येत आहे. “अशा कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी ही जनतेची मागणी असून, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभर जनआक्रोश आंदोलन छेडले जाणार आहे,” असे ते म्हणाले.
बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागृहाजवळ ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता हा मोर्चा निघणार आहे. जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन बुधवत आणि वाघ यांनी संयुक्तपणे केले आहे.