Former CM alleges BJP does not regard Marathi people as Hindus : मुंबईवर गुजरातच्या ‘शेठ’चा डोळा, उद्धव ठाकरेंची टीका
Mumbai शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या मुलाखतीत त्यांनी महापालिकेतील मराठी जनतेच्या हक्कांवर भर दिला असून, आगामी निवडणुकीत शिवसेना (उद्धव गट) पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मुंबई ही मराठी माणसांची आहे आणि महापालिकेत मराठी जनतेचे हक्क अबाधित राहायला हवेत. त्यांनी स्पष्ट केले की, “मराठी माणसांच्या दुहीचा फायदा अब्दाली घेतायत. यांना आईबाबांचा पत्ता नाही. मारामाऱ्या लावतात आणि हे सत्ता उपभोगतात. खरे दुश्मन ते आहेत. पण माझी माणसं फोडून माझ्यावर फोडतात.”
उद्धव ठाकरे या मुलाखतीत आक्रमक होते. मुंबईच्या प्रश्नांवर त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. या मुलाखतीत ठाकरे पुढे म्हणाले, “मुंबईवर २ शेठनी कब्जा करायचाय. संयुक्त महाराष्ट्रवेळी मराठींवर गोळ्या झाडणारा मोरारजी गुजराती होता. हा नरराक्षक गुजरातचा होता. १९६० सालापासून आतापर्यंत मुंबईवर यांचा डोळा आहे. यांना महाराष्ट्रातून मराठी संपवायची आहे, मराठी माणूस बाहेर काढायचा आहे. धारावीच्या रुपात अर्धी मुंबई अदानींच्या घशात घातली आहे. आम्ही मोर्चा काढू, आंदोलन करु. पण अनेक कामे ऑर्डरने देऊ. त्यांची सत्ता आली तर ते पुन्हा मुंबईचं बॉम्बे करतील.”
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या कामकाजावरही भाष्य केले. ते म्हणाले की, “टोलमुक्त कोस्टल रोड आम्ही केला पण फित कापण्याचं भाग्य त्यांना लाभलं. आताच भ्रष्टाचाराचं प्रदूषण आपल्याला दिसतंय. सगळीकडे धूळ आणि सिमेंटचं साम्राज्य आहे. ४ वर्षात ३ लाख कोटींचा घोटाळा केलाय. मुख्यमंत्र्यांना दुसऱ्याचा बाप घ्यावा लागतोय. तुमच्या वाडवडिलांचं नाव सांगून मत मागा. मेट्रोची कामे काँग्रेसच्या काळात सुरु झाली. कोस्टल रोड, पाण्याची कामे, धरणे आम्ही विक्रमी वेळेत केले.” तसेच “शिवसनेची स्थापना झाल्यापासून एअर इंडिया, एमटीएनएल अशा आस्थापनांमध्ये शिवसेनेने नोकऱ्या दिल्या.” असेही ते म्हणाले.
या मुलाखतीत त्यांनी मराठी जनतेच्या हक्कांवर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की, “मराठी माणसात फूट पडत चाललीय. ठाकरे ब्रॅंड वेगळा असल्याने नुकसान नक्कीच झालं. गेल्या २-३ वर्षांत मुंबईत मराठी माणसावर दादागिरी सुरु झालीय. घर नाकारलं जातं. आहारावरुन नाकारलं जातं. मराठी माणूस बाहेर जाऊन असं कुठेच वागत नाही. सुरत, अहमदाबादमध्ये मराठी आहेत. पण इथे आमच्याकडे येऊन दादागिरी करायला लागलेत. मी आणि राज वेगळे होतोच. तेव्हा मराठीवर दुसऱ्यांकडून आक्रमण झालं नव्हतं.”
Amravati Municipal Election : ‘कमळापेक्षा कोणीही मोठा नाही; युवा स्वाभिमानशी भाजपचा काडीमोड!’
“आमच्यावर आरोप करणाऱ्यांच्या सोबत मुस्लिम आहेत. भाजप स्वत:ला मराठी का नाही समजतं. शिवाजी महाराज, बाळासाहेब कोण होते? इतकी मजल गेलीय की हे मराठींना हिंदू मानत नाहीत.” खरी शिवसेना कोणती असा प्रश्न विचारल्यास त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “दुसरी शिवसेना नाही, ही शाहसेना आहे. वापर करुन त्यांना फेकणार. यांना मराठी मतं फोडायची आहेत. यांना मराठी माणसं फोडायची आहेत. आता चुकाल तर संपाल”
कोरोना काळातील भ्रष्टाचारावरही त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. ” कोरोनामध्ये कुठला भ्रष्टाचार झाला. ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार करणारे अजित पवार यांच्यासोबत ते लोक बसलेत. महाराजांचा टोप मोदींना घालणं हा महाराजांचा अपमान आहे.”








