We protested for farmers; how are we rioters? : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा संतप्त सवाल; सीडीआर तपासण्याची मागणी
Amravati “दुष्काळग्रस्त अमरावती जिल्हा जाहीर करा आणि बंद पडलेली एक रुपयांत पीक विमा योजना पुन्हा सुरू करा,” या मागणीसाठी आम्ही शेतकऱ्यांसह आंदोलन केले होते. मात्र, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी या आंदोलनावरून थेट दंग्याची तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमच्यासह शेतकऱ्यांवरही दंग्याचे गंभीर गुन्हे नोंदवले. मग शेतकऱ्यांसाठी लढा देणारे आम्ही दंगेखोर कसे? असा संतप्त सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
गुडधे म्हणाले, “खोटे गुन्हे मागे घ्यावेत, ही आमची मागणी नाही. पण याच सातपुते यांच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी सातपुते यांनी तक्रार का दाखल केली नाही? पोलिसांनी त्यांच्यावर दंग्याचे गुन्हे का लावले नाहीत?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारपुरस्कृत दुजाभाव होत असल्याची शंका व्यक्त केली.
Makrand Patil : निकृष्ट दर्जाचा पूल बांधला, पालकमंत्र्यांना घेरले
पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज कडू व नरेंद्र पडोळे उपस्थित होते. आंदोलनाची वेळ आणि एफआयआर नोंदविण्याच्या कालावधीत सातपुते यांना कुणाचे फोन कॉल आले होते का, हे शोधण्यासाठी त्यांचा सीडीआर तपासावा, अशी मागणीदेखील करण्यात आली. “पालकमंत्री शुक्रवारी जिल्ह्यात येऊनही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत,” असा आरोपही यावेळी करण्यात आला.
Heavy Rain : पाण्याच्या वेढ्यात कमळजा माता मंदिर; तरीही भाविकांचा ओढा
“जमावबंदीचे उल्लंघन झाल्यामुळे आमच्यावर दंग्याचे गुन्हे दाखल केले, तर शहरातील जुगार अड्ड्यांवरील जमावावरही तसेच गुन्हे दाखल करणार का? त्या अड्ड्यांचे चालक व मालकांविरुद्ध कारवाई करणार का?” असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उपस्थित केला.
“शासकीय सेवेत असताना सातपुते यांनी स्वतःच्या व कुटुंबीयांच्या नावे किती बेनामी संपत्ती गोळा केली, याची एसीबीमार्फत चौकशी व्हावी. तसेच, त्यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहाराबाबतची सप्रमाण तक्रारही आम्ही एसीबीकडे करणार आहोत,” असे गुडधे यांनी सांगितले. जिल्ह्यात एचटीबीटी कपाशीचे प्रतिबंधित बियाणे उपलब्ध नसतानाही सातपुते यांच्या वरदहस्ताने त्यांची विक्री झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.








