case has been filed against Shiv Sena district chief Gopal Datkar : मुख्य जलवाहिनीवरील अवैध कनेक्शनचे प्रकरण; अकोट न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
Akot ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरीत्या कनेक्शन घेऊन मोठ्या प्रमाणात पाणी चोरी केल्याच्या आरोपावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद गटनेते गोपाल दातकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगणी (ता. अकोट) येथील सरपंच कल्पना पळसपगार यांनी दिलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी अकोट न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर दहीहंडा पोलिसांनी कलम ३०३(२) अंतर्गत दातकर यांच्यावर गुन्हा नोंदविला.
तपासात असे आढळून आले की, दातकर यांनी वर्ष २०१० पासून ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीवर अवैध कनेक्शन घेतले होते. घरातील टाकी भरणे, शेतातील तळ्यात पाणी साठवणे, २४ तास घरात पाण्याचा वापर, अशा प्रकारे पाणी वापरल्यामुळे अंदाजे ४ लाख ९५ हजार ३५२ रुपयांच्या पाण्याचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने, ४ ऑगस्ट २०२४ रोजी हे अवैध कनेक्शन तोडण्यात आले. याआधीही जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांनी केलेल्या पाहणीत दातकर यांच्या ठिकाणी अवैध जलवाहिनी आढळली होती.
सरपंच कल्पना पळसपगार यांनी केलेल्या तक्रारीनुसार, दातकर यांनी १६० मि.मी. व्यासाच्या पाइपद्वारे मुख्य जलवाहिनी टाकीच्या इनलेटला जोडली, घर व शेतासाठी पाणी वापरले. पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांशी अरेरावी केली.यावरून पाणीपुरवठा व्यवस्थेचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट दिसून आले.
Local Body Elections : मिनी मंत्रालयातील ‘दोस्तीतील कुस्ती’ पुन्हा रंगणार?
हिंगणी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी जिल्हाधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, दहीहंडा पोलिस तसेच पोलिस अधीक्षकांकडे वारंवार तक्रार दिली होती. परंतु, कारवाई न झाल्यामुळे तक्रारीची दखल न घेतल्यामुळे त्यांनी प्रकरण कलम १५६(३) अंतर्गत अकोट न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने तक्रारीला गांभीर्याने घेत निर्देश दिल्यानंतर अखेर दहीहंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.








