Breaking

Union Minister Prataprao Jadhav : आरोग्य तपासणीचा विश्वविक्रम!

 

One crore citizens’ health check-up recorded in Guinness World Records : एक कोटीहून अधिक नागरिकांचा सहभाग; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Buldhana आयुष मंत्रालयाच्या वतीने देशभरात राबविण्यात आलेल्या ‘देश का प्रकृती परीक्षण अभियान’ या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या अभियानाद्वारे पाच नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आले आहेत. अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने प्रारंभ झालेल्या या अभियानाचा समारोप २५ डिसेंबर २०२४ रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी दिनी करण्यात आला. या एक महिन्याच्या कालावधीत एक कोटी २९ लाखांहून अधिक नागरिकांचे आरोग्य परीक्षण करण्यात आले. राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अभियानाची घोषणा करण्यात आली होती.

आयुष मंत्रालयाच्या नावावर नोंद झालेली पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स ही भारताच्या आरोग्य सेवेसाठी असलेल्या वचनबद्धतेचे आणि जागतिक स्तरावर आयुर्वेदाच्या वाढत्या मान्यतेचे प्रतीक असल्याचे मंत्री जाधव यांनी सांगितले. येत्या काळात जिल्हा आणि तालुका स्तरावर केंद्र सरकारच्या वतीने आयुर्वेदिक औषधालये सुरू करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या अभियानासाठी १,८१६६७ स्वयंसेवकांनी योगदान दिले. तसेच, या उपक्रमामुळे भारतीय आरोग्य व्यवस्थेचे नेतृत्व, आयुर्वेदाचे महत्त्व आणि आधुनिक वैद्यकीय प्रणालीतील संशोधनासाठी नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वासही मंत्री जाधव यांनी व्यक्त केला.

जाधव यांच्यासाठी ठरला मोठा उपक्रम
प्रतापराव जाधव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हा उपक्रम राबविण्यात आला. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये जे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यात प्रकृती परीक्षण हा उपक्रम देखील समाविष्ट आहे. पण आयुष मंत्रालयामार्फत हे अभियान राबविण्यात आल्याने जाधव यांच्या नेतृत्वात काम झाले. त्यामुळे देशभरात मिळालेल्या प्रतिसादासाठी प्रतापराव जाधव यांना देखील श्रेय दिले जात आहे