Vanchit Bahujan Aghadi : वंचितचा ‘एकला चलो रे’ प्रयोग कितपत यशस्वी?

Is Vanchit’s ‘Ekla Chalo Re’ experiment paying off? : नाराज कार्यकर्ते आणि संघटनात्मक ढिलाईमुळे वाईट परिस्थिती

Akola महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत स्वबळावर तब्बल ५२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. मागील महापालिका निवडणुकीत वंचितला स्वबळावर केवळ तीन जागांवर यश मिळाले होते, तर त्याआधीच्या निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले होते. मात्र, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये मिळालेल्या तुलनेने चांगल्या यशाच्या पार्श्वभूमीवर यावेळी महापालिका निवडणूकही स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला.

हा निर्णय धाडसी असला, तरी त्याची अंमलबजावणी करताना झालेल्या तिकीट वाटपामुळे अनेक प्रभागांत पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. दीर्घकाळ पक्षासाठी काम करणारे, संघर्षातून उभे राहिलेले कार्यकर्ते डावलल्याची भावना अनेक ठिकाणी दिसून येत आहे. परिणामी, काही प्रभागांत उमेदवारांच्या प्रचारात अपेक्षित उत्साह आणि आक्रमकता दिसत नसल्याचे चित्र आहे.

Anil Bonde : “आमच्यासोबत चालता अन् आमचाच खिसा कापता”; अमरावतीत भाजप खासदारांचा नवनीत राणांवर बोचरा वार!

राजकीय जाणकारांच्या मते, महापालिका निवडणूक ही केवळ विचारांची लढाई नसून संघटनात्मक शिस्त, बुथ व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठ मेहनतीची खरी कसोटी असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २०० ते ३०० मतांचा फरक निकाल ठरवतो. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांची उदासीनता किंवा संघटनात्मक ढिलाई महागात पडू शकते.

वंचितच्या बाजूने पाहिले, तर स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षाच्या दीर्घकालीन विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देत सामाजिक समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्टार प्रचारकांच्या सभा, कॉर्नर बैठकांद्वारे आणि पदयात्रांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही दिसते.

Sajid Khan Pathan : एमआयएमच्या कुबड्यावर भाजप पदाधिकाऱ्याची नगरपरिषदेत एन्ट्री

मात्र ‘कॅडर-बेस्ड’ पक्षांसाठी कार्यकर्त्यांची मोट एकत्र ठेवणे अत्यंत आवश्यक असते. नाराज कॅडर निष्क्रिय राहिल्यास प्रचाराची धार बोथट होते आणि प्रतिस्पर्ध्यांना संधी मिळते. बाहेरील राजकीय आव्हानासोबतच अंतर्गत असंतोषाचे व्यवस्थापन करणे, हेच वंचितपुढील मोठे दुहेरी आव्हान ठरत आहे. हे आव्हान वेळेत पेलले गेले, तर ‘एकला चलो रे’चा प्रयोग यशस्वी ठरू शकतो; अन्यथा तो फसण्याची शक्यताही नाकारता येत नाही.