Cotton Slot Booking System Proves Complicated : ऑनलाइन प्रक्रियेने विक्री अवघड; स्मार्टफोन नसलेल्यांना केंद्रावर पोहोचणे कठीण
Buldhana यंदाच्या हंगामात कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना आता रेल्वे तिकिटाप्रमाणे आगाऊ स्लॉट बुक करावा लागणार आहे. हमी दराने कापूस विक्री करण्यासाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडील केंद्रावर जाण्यापूर्वी किमान तीन दिवस आधी ‘कपास किसान’ ॲपवरून स्लॉट बुकिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. संबंधित दिवशी जागा उपलब्ध नसेल तर शेतकऱ्यांना दुसरी तारीख निवडावी लागणार आहे.
खुल्या बाजाराच्या तुलनेत सीसीआयने कापसाला सुमारे हजार रुपयांनी अधिक दर जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हमी केंद्रांकडे वाढला आहे. मात्र, यंदाची विक्री प्रक्रिया अधिक तांत्रिक आणि गुंतागुंतीची ठरली आहे. प्रथम शेतकऱ्यांना ॲपवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर कागदपत्र पडताळणी, बाजार समितीकडून मंजुरी आणि मग सीसीआयकडून अंतिम मान्यता. या सर्व टप्प्यांनंतरच शेतकऱ्यांना विक्रीसाठी तारीख निश्चित करता येते.
Maharashtra Government : ६००० रुपये द्या, एसीमध्ये चहा-कॉफी प्या!
शेतकऱ्यांनी निवडलेल्या दिवशी केंद्रावर नोंद जास्त असल्यास ॲपवर ‘जागा उपलब्ध नाही’ असा संदेश दाखवला जाईल. त्यावेळी शेतकऱ्यांना दुसरी तारीख बुक करावी लागेल. ही अट शेतकऱ्यांसाठी नव्याने अडचणी निर्माण करणारी ठरत असून “शेतमाल विकायलाही आता मोबाईल आणि ॲप हवे”, अशी व्यथा अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, तसेच ऑनलाइन प्रक्रियेची माहितीही अपुरी आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना स्थानिक दलाल व व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. परिणामी, सीसीआयचा उद्देश हाती हमी दर मिळावा हा असला, तरी प्रत्यक्षात व्यापाऱ्यांना फायदा आणि शेतकऱ्यांना तोटा अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
Local Body Elections : दिवाळीची आतषबाजी संपली, आता वाजणार निवडणुकांचे ‘फटाके’!
ऑनलाइन स्लॉट बुकिंग प्रणाली प्रभावी करण्यासाठी तालुका व बाजार समिती स्तरावर “मार्गदर्शन केंद्रे” उभारावीत, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.सीसीआय केंद्रांवरील क्षमता आणि नोंदींची माहिती ॲपवर दिसत असली तरी ग्रामीण भागातील डिजिटल दरी ही मोठी अडचण ठरत आहे. हमी दराच्या माध्यमातून सरकारने कापसाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र या तांत्रिक बंधनांमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवणे कठीण बनले आहे.








