Road reopened after farmers’ hunger strike : सात दिवसांच्या आमरण उपोषणानंतर शेवटी रस्ता खुला
Buldhana राजकीय हस्तक्षेप, प्रशासनाची उदासीनता आणि संपूर्ण यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष — या सगळ्यांविरोधात सात दिवसांपासून सुरू असलेल्या धोत्रा भनगोजी (ता. चिखली) येथील ७० शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला अखेर यश मिळाले आहे. बुधवारी रात्री उशिरा प्रशासनाने प्रत्यक्ष कृती करत शेत रस्ता खुला केला आणि शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
राज्यात खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असताना, धोत्रा भनगोजी येथील शेतकऱ्यांना रस्त्याअभावी शेतीसाठी जाणे अशक्य झाले होते. शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासन दरवाजे ठोठावले, मात्र राजकीय दबावामुळे अधिकारी निष्क्रिय असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
विलास हळदे, संजय गुजर, दुर्गा हळदे, गजानन जाधव, शिवदास कापसे, मीना गुजर, वर्षा गुजर, सुवर्णा भालेकर आदी शेतकरी महिलांनीही आघाडीवर राहून जिजामाता प्रेक्षागृहासमोर आमरण उपोषण सुरू केले.
उपोषण सुरू असताना विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी भेटी देऊन गेले. मात्र, त्या भेटी केवळ फोटोपुरत्याच मर्यादित राहिल्या. शेतकऱ्यांची एकजूट, निर्धार आणि न थांबणारी प्रतिकारशक्ती पाहता अखेर प्रशासनाची झोप उडाली.
९ जुलै रोजी सातव्या दिवशी चिखलीचे तहसीलदार गायकवाड व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने रखडलेला शेत रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंतर नायब तहसीलदार हिवाळे आणि अॅड. सतीशचंद्र रोठे (आझाद हिंद संघटना) यांच्या हस्ते नारळपाणी देऊन उपोषण संपन्न झाले.
Uddhav Balasaheb Thackarey : खते-बियाण्यांची दरवाढ; शेतकरी अडचणीत!
या संपूर्ण आंदोलनाने पुन्हा एकदा राजकीय पोकळ आश्वासनांचा आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा चेहरा उघड केला आहे. शेतकऱ्यांना रस्त्यासारख्या मूलभूत गरजेसाठी देखील उपोषणाचे टोक गाठावे लागते, ही शासन व्यवस्थेची मोठी शोकांतिका आहे.
या आंदोलनातून शेतकऱ्यांची एकजूट आणि संघटित संघर्षच परिवर्तन घडवू शकतो, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. बुलडाण्यातील ही घटना संपूर्ण राज्यासाठी शासनाला जाग येण्यासाठीचा इशारा मानली जात आहे.