Breaking

Vidarbha Farmers : ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेताचा झाला तलाव!

The farm became a pond due to the contractor’s negligence : दुसऱ्यांदा पेरलेले सोयाबीन पाण्याखाली; दोषींवर कारवाई आणि नुकसानभरपाईची मागणी

Chikhali : तालुक्यातील अंत्रीकोळी शिवारातील शेतकऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि ठेकेदाराच्या निष्काळजी कारभाराचा दाहक फटका बसला आहे. गट क्र. २३, २४ व २५ मधील शेतजमिनीत दुसऱ्यांदा पेरणी केलेले सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रस्त्याच्या कामात नाल्यांची व्यवस्था न केल्यामुळे शेतात तलावसदृश स्थिती निर्माण झाली असून, ही परिस्थिती केवळ ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि विभागाच्या दुर्लक्षामुळे ओढवली आहे, असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी वेळोवेळी नाल्यांची मागणी केली होती, मात्र PWD व संबंधित अधिकाऱ्यांनी ती दुर्लक्षित करून ठेकेदार बुधवानी यांना अभय दिले. परिणामी पावसाचे पाणी थेट शेतात शिरले. यासंदर्भात केलेल्या तक्रारींकडे १५ दिवसांपासून दुर्लक्ष होत असून, PWD व महसूल प्रशासन जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : नक्षलवाद्यांना ठणकावून सांगायचंय, आम्ही ‘भारत माता की जय’ म्हणणारे आहोत !

शेतकऱ्यांनी विचारणा केल्यावर ठेकेदाराने “माझ्याकडे एकच काम आहे का?” असे उर्मट उत्तर दिले. “मी अनेक रस्त्यांची कामे केलीत, तुम्ही काय शिकवणार?” असा टोकाचा सूर ठेकेदाराने धरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या ठेकेदाराला पाठीशी घालून निकृष्ट दर्जाचे काम अंगीकृत केल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी लावला.

राजकीय प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर अद्याप मौन बाळगले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मत मागताना तत्परतेने प्रतिक्रिया देणारे राजकीय नेते अशा प्रसंगी कुठे आहेत, असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

Adv. Abhijit Wanjari : उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्राध्यापकांची ३६०० पदे रिक्त!

या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी तहसीलदार गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांनी दोषींवर कारवाई, नुकसानभरपाई आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करत न्याय न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.