One farmer commits suicide every eight hours in Western Vidarbha : धक्कादायक वास्तव; सहा महिन्यांत ५२७ शेतकऱ्यांनी संपवला जीवनप्रवास
Amravati पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र गंभीर वळणावर पोहोचले आहे. जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत अमरावती विभागात तब्बल ५२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक १७८ आत्महत्या झाल्या आहेत. विभागात दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळतो आहे, हे वास्तव अधिकच भयावह आहे.
नैसर्गिक आपत्ती, सततची नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा, सावकारांचा तगादा, मुलींचे लग्न, कुटुंबातील आजारपण यांसारख्या अनेक सामाजिक व आर्थिक कारणांमुळे शेतकऱ्यांचे जीवन खिळखिळे होत आहे. शासन व प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे या समस्यांचे गांभीर्य वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
Local Body Elections : अमरावती जिल्हा परिषद गट रचनेत होणार अदलाबदल
विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार, २००१ ते जून २०२५ या कालावधीत अमरावती विभागात एकूण २१,६७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये
१०,१३६ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र
१०,२२९ प्रकरणे अपात्र
३०९ प्रकरणे चौकशीस प्रलंबित
१०,१२४ प्रकरणांमध्ये मदत वितरित
हे आकडे शासनाच्या दाव्यांना छेद देणारे आणि तातडीने उपाययोजनांची गरज अधोरेखित करणारे आहेत.
जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्यांचा तपशील (२००१–२०२५ जूनअखेर)
जिल्हा आत्महत्यांची संख्या
यवतमाळ ६,३५१
अमरावती ५,४७७
अकोला ३,२०७
बुलढाणा ४,५३२
वाशिम २,१०७
Vikas Thakre : आता ब्रजेश दिक्षितांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे !
सहा महिन्यांत जिल्हानिहाय आत्महत्या (2025, जानेवारी–जून)
यवतमाळ : १७८
अमरावती : १०१
बुलढाणा : ९१
अकोला : ९०
वाशिम : ६७
राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांमध्ये होत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
‘महाडीबीटी’ यंत्रणेचा फज्जा
कृषी विभागाच्या योजनांचा लाभ ‘महाडीबीटी’ पोर्टलद्वारे देण्यात येतो. अर्जदारांची निवड राज्यस्तरीय ड्रॉद्वारे होते. यामध्ये गरजू शेतकरी वंचित राहतात तर लाभ अनावश्यक अर्जदारांना मिळतो. त्यामुळे शासनाच्या मदतीपासून खरेच गरजवंत शेतकरी दूर राहत आहेत, हे मोठे अपयश ठरत आहे.