Vidarbha sahitya sangha : ‘टपाल’ मतपत्रिकेवरून वादाचा धुरळा; ‘ती’ २ हजार मते कुणाची?

dout-of-duplicate-postal-ballot-in-vidarbha-sahitya-sangh-election : गिरीश गांधींच्या सृजनसेतू पॅनलला एकतर्फी कौल, निकालामागे गैरप्रकाराचा संशय

Nagpur विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीच्या निकालाने साहित्य वर्तुळात अनेकांना मोठा धक्का बसला आहे. हा निकाल इतका एकतर्फी कसा लागला, यावरून सध्या साहित्यिकांमध्ये आश्चर्यासोबतच संतापाची लाट आहे. या निकालामागील कारणही तितकेच खळबळजनक असल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीत टपालाद्वारे आलेली सुमारे दोन हजार मते केवळ आणि केवळ गिरीश गांधी यांच्या ‘सृजनसेतू’ पॅनेलच्या उमेदवारांच्याच पारड्यात पडली आहेत. टपाल मतदानातील हा एकतर्फी कल पाहता, यात मोठा तांत्रिक घोळ असल्याची शंका आता बळावली आहे.

एका पराभूत उमेदवाराने तर हा शंभर टक्के गैरप्रकार असल्याचा दावा केला आहे. हे वास्तव जगाला ठावूक असले, तरी आम्ही ते पुराव्यानिशी सिद्ध करू शकत नाही, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत गांधी यांच्या पॅनेलबाहेरील श्रीपाद अपराजित हे एकमेव उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, हा निकालही गांधी आणि कंपनीच्या नियोजित रणनीतीचाच एक भाग होता, असा दावाही विरोधकांकडून केला जात आहे.

Chandrakant patil : अनुदानित महाविद्यालयांत प्राध्यापकांची मोठी भरती

या निवडणुकीत टपालाने प्राप्त झालेल्या सुमारे दोन हजार मतपत्रिकांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी किंवा अधिकृत शिक्का नव्हता, असा गंभीर आरोप होत आहे. यावरून या मतपत्रिका ‘डुप्लिकेट’ छापल्या होत्या की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात, जिथे चलनी नोटांची बनावट छपाई होऊ शकते, तिथे साहित्य संघाची मतपत्रिका छापणे कठीण काम नाही. या कथित बनावट मतपत्रिकांच्या माध्यमातून सोयीनुसार मतदान करून घेण्यात आले, ज्यामुळे विरोधकांच्या पॅनेलला एकही मत मिळू शकले नाही. गिरीश गांधी यांच्या पॅनेलला कोणत्याही परिस्थितीत जिंकवून द्यायचे, हे आधीच ठरले होते. त्यामुळे जिथे जिथे संधी होती, तिथे राजकीय वजन आणि यंत्रणेचा गैरवापर केल्याची चर्चा आता रंगली आहे.

Jitendra Awhad controversy : सभागृहात माफी मागत असतानाही आव्हाडांच्या वागण्यात मग्रुरी होती, मुधोजी भोसलेंनी सुनावले

निवडणुकीत एखाद्या संघटित गुन्हेगारीप्रमाणे व्यूहरचना आखण्यात आल्याचा आरोप एका उमेदवाराने नाव न छापण्याच्या अटीवर केला. टपालाने येणाऱ्या मतपत्रिकांपैकी एकही मत विरोधात जाऊ नये, यासाठी पोस्टाचे मुख्यालय ते स्थानिक पोस्ट ऑफिस आणि पोस्टमनमार्फत होणारी डिलिव्हरी या संपूर्ण साखळीवर ‘चोख बंदोबस्त’ ठेवण्यात आला होता. यादरम्यान मूळ मतपत्रिका पळवून त्याऐवजी बनावट मतपत्रिका पुन्हा पोस्टमनमार्फत साहित्य संघाच्या मतपेटीत टाकण्यात आल्या, असा संशय व्यक्त होत आहे. आमच्याकडे याचे ठोस पुरावे नसल्याने आम्ही कोणाचे नाव घेऊ शकत नाही. आम्ही साहित्यिक आहोत, त्यामुळे केवळ पराभूत झाल्याने कपोलकल्पित कथा रचत आहोत, असा आरोप आमच्यावर होऊ शकतो, असे म्हणत या उमेदवाराने निवडणुकीतील कथित गैरव्यवहाराचा पाढाच वाचला.