Beed politics is Maratha vs. OBC : शाळांमधून मुलं काढण्याचं काम सुरू झालं
Nagpur : बीड जिल्ह्यात झालेल्या घटनांमुळे महाराष्ट्राती किती बदनामी झाली, याची कल्पना सत्ताधाऱ्यांना आलेली दिसत नाही. मराठा विरूद्ध ओबीसी, असं बीडचं राजकारण झालं आहे. शाळांमधून मुलं काढण्याचं काम सुरू झालं आहे. मराठवाड्यात मराठ्यांच्या शाळा असतील तर ओबीसींची मुलं नाव काढत आहेत आणि ओबीसींच्या शाळा असतील असतील तर मराठ्यांची मुलं नाव काढत आहेत. हे जे चाललंय ते फार भयानक आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी चिंता व्यक्त केली.
नागपुरात आज (८ मार्च) वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राजकीय वाद सामाजिक स्तरावर गेलेला आहे. सरकारला कायदा सुव्यवस्थेचे देणं घेणं राहिलं नाही. आपल्या माणसाला मदत करा. मग तो कसाही असो. गुंड असो वा डाकू, त्याला मदत केली पाहिजे, ही सत्ताधाऱ्यांची काम करण्याची पद्धत आहे. यामुळे देशात महाराष्ट्राचं नाव बदनाम होत आहे. महाराष्ट्रातील बीड आणि आणखी दोन-तीन जिल्ह्यांत आता इतके टोकाचे वाद दोन्ही समाजांनी सुरू केले आहे आणि याला सर्वस्वी सत्ताधारी जबाबदार आहेत.
महाराष्ट्रातील गुन्हेगारी कारवायांवर सरकारचं लक्ष दिसत नाही. हा उद्रेक महाराष्ट्राच्या हिताचा नाही. पुरोगामी विचाराच्या दृष्टीने उद्या अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकार बीडची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलेलं आहे. महाराष्ट्रात काय चाललेलं आहे? कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही. गुन्हेगार खुलेआम वावरत आहेत. सरकारने त्यांच्यावर अंकुश लावला पाहिजे. पण सरकारच त्यांना अभय देत आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राची स्थिती यापेक्षाही गंभीर होईल, अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
Road Safety Campaign : रस्ते चांगले झाले तरीही अपघाती मृत्यू वाढले!
पोलीस किंवा गृह विभागाचा काय रिपोर्ट आहे, माहीत नाही. मात्र ज्यावेळेस एखादी मोठी घटना होईल, त्यावेळी हजारो लोकांना आपला जीव गमावा लागेल, अशी परिस्थिती बीडमध्ये निर्माण झाली आहे. आताही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सरकारने केले नाही. तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यानंतर कुणाची ईच्छा असूनही त्यावर नियंत्रण मिळवता येणार नाही. त्यामुळे सरकारने वेळीच लक्ष घालून बीडसह इतर काही जिल्ह्यांत जी प्रकरणे झाली, त्यावर ‘अभ्यास’ करून कारवाई केली पाहिजे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.