What is the need to spend ₹35,000 crore on the Kumbh Mela?, Vijay Wadettiwar questions : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघाती हल्ला
Nagpur राज्यातील शिक्षण व्यवस्थेची पुरती वाताहत झाली असताना आणि मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव असताना कुंभमेळ्यावर तब्बल ३५ हजार कोटी रुपयांची उधळपट्टी कशासाठी केली जात आहे, असा थेट सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. देश आणि राज्यातील ९२ हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, शाळांमध्ये शिक्षक नाहीत, रस्ते नाहीत, पिण्याचे पाणी आणि शौचालयांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. असे असताना शिक्षण व्यवस्थेवर खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, मात्र कुंभमेळ्याच्या नावाखाली ३५ हजार कोटींची लुटालूट सुरू आहे, असा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी केला.
कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये आणि विद्यार्थ्यांना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे तीन हजार रुपये नाही का असा सवाल करून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी सरकारला कानपिचक्या दिल्याचा दाखला देत वडेट्टीवार पुढे म्हणाले की, या सरकारला पंतप्रधान मोदींच्या विचारांचा भारत घडवायचा आहे. कुंभमेळ्यात डुबकी मारून स्वत:ला शुद्ध करायचे आणि दुसरीकडे देशाची संपूर्ण शिक्षण व्यवस्था नष्ट करायची असाच यांचा अजेंडा आहे. जेव्हा आम्ही या नको त्या उधळपट्टीवर प्रश्न विचारतो, तेव्हा आम्हाला थेट हिंदू विरोधी’ ठरवले जाते. आमचा कुंभमेळ्याला अजिबात विरोध नाही, परंतु गरज आहे तेवढाच खर्च करा. प्रयागराजशी स्पर्धा करण्याच्या नादात बाहेरचे कंत्राटदार आणून लूट केली जात आहे. ५०० कोटींचे कामे येथील पेटी कंत्राटदारांना ३०० कोटींत देऊन मोठा भ्रष्टाचार केला जात आहे.
Coaching Class Rules : शाळेजवळ कोचिंग क्लासेसला बंदी, नियम मोडल्यास ५० लाखांपर्यंत दंड!
कुंभमेळ्याचे अवाढव्य बजेट तातडीने कमी करून हा निधी राज्यातील शिक्षण व्यवस्थेसाठी, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी आणि आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी वापरण्यात यावा, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली. रस्त्यांची दुरुस्ती करा आणि आवश्यक त्या सुविधा नक्कीच निर्माण करा, पण ३५ हजार कोटी रुपयांची लूट थांबवून पुढील पिढीच्या भविष्याचा विचार करा, अशीही विनंती वडेट्टीवार यांनी सरकारला केली.








