Increase public relations to hoist the BJP flag on local body : जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
Buldhana आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत भारतीय जनता पक्षाने बुलढाणा जिल्ह्यातील संघटन सक्रिय करण्यास सुरूवात केली आहे. जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच माजी आमदार विजयराज शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांची जिल्हा कार्यशाळा घेतली.
राजमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्ताने स्थानिक राजे गार्डन येथे आयोजित या कार्यशाळेत भाजप नेते प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय दिशा व विचारधारा यांचा वेध घेण्यात आला. या प्रसंगी आमदार श्वेता महाले-पाटील, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, माजी आमदार तोताराम कायंदे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य, महिला व युवक मोर्चा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “अहिल्यादेवी होळकर यांची प्रशासनिक कुवत आणि लोकहितकारी धोरणे आजच्या राज्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहेत. महिलांच्या नेतृत्वाला चालना देणारा त्यांचा वारसा भाजप पुढे नेत आहे.”
आमदार महाले यांनी भाजपचे महिला सशक्तीकरणाबाबतचे धोरण अधोरेखित करत सांगितले की, “अहिल्याबाई होळकरांचा गौरव म्हणजे प्रत्येक महिलेला सन्मान. भाजपने महिलांसाठी केलेले कार्य याचेच प्रतीक आहे.” नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे म्हणाले, “जिल्हाध्यक्षपद ही जबाबदारी आहे. भाजपच्या झेंड्याला बुलंद करण्यासाठी आता प्रत्येक पदाधिकाऱ्याने कामाला लागावे लागेल. आगामी निवडणूक ही केवळ सत्ता-संघर्ष नाही. कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव आहे.”
Seperate Vidarbha state : स्वतंत्र विदर्भासाठी पुन्हा एकदा हुंकार!
या कार्यशाळेमुळे भाजपने बुलढाणा जिल्ह्यात निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या तयारीला गती दिली आहे. विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन पुन्हा सक्रिय होत असल्याचे संकेत देण्यात आले.