Vote theft case : राज्यातील सर्व मतदार याद्या स्क्रॅप करण्याची गरज

BJPs tone echoes of opposition, senior leaders statement : विरोधकांच्या सुरात भाजपचा सूर, बड्या नेत्याचे वक्तव्य चर्चेत

Mumbai : महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या मतदार याद्यांवरून अभूतपूर्व धुमशान सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्ष दोन्हींकडून आरोप-प्रत्यारोपांचा वर्षाव होत असून, या वादात आता भाजपकडूनही विरोधकांच्या सूरात सूर मिसळल्याचे चित्र दिसत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “राज्यातील सर्व मतदार याद्या स्क्रॅप करण्याची गरज आहे.”

राज्यात मनसे, महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांनी मतदार याद्या सदोष असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला आहे. मुंबईत झालेल्या सभेत त्यांनी बोगस मतदानाविरोधात जोरदार हल्लाबोल करत, “मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही,” असा इशाराही दिला होता. त्यानंतर आज दोन मोठ्या घडामोडी घडल्या — एकीकडे विरोधकांचे शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीला गेले, तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज संध्याकाळी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

Ladki bahan Yojana : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी!

या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, “लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लगेचच विरोधकांनी निवडणूक आयोगाची भेट घ्यायला हवी होती. आमच्याही जागा निवडून आल्या, पण आम्हीच पहिला आक्षेप घेतला की यादीत त्रुटी आहेत. मतदार याद्यांमध्ये डिलिशन होत नाही, उलट ॲडिशन होत आहे.”

ते पुढे म्हणाले, “कामठी, मालेगाव, सिल्लोड यांसारख्या ठिकाणी एकाच व्यक्तीचे नाव चार-पाच वेळा आले आहे. हिंदूंच्या नावांवर आक्षेप घेतला जातो, पण मुस्लीम बुथवरही तीच स्थिती आहे. काही भागात भाजपला एक मत, तर काँग्रेसला 500 मते मिळाली आहेत. हे कसे शक्य आहे?”

बावनकुळे यांनी या प्रकरणात काँग्रेस आणि महाविकास आघाडीवरही टीका केली. “ज्या भागात मुस्लीम मतदारसंख्या वाढली आहे, तिथल्या याद्यांमध्ये दुबार-तिबार नावं येत आहेत. पण विरोधक तिथे आक्षेप घेत नाहीत. यामुळे राज्यातील सर्व मतदार याद्या स्क्रॅप करून नव्याने तयार करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

Controversial statement : ‘एक वेळ आई मेली तरी चालेल’… शिंदे गटाच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य !

त्यांनी पुढे सुचवले की, “राज्यातील सर्व मतदार याद्यांना एसआरएमध्ये घेऊन नव्याने पडताळणी करावी. लोकशाही प्रक्रियेवर लोकांचा विश्वास टिकवायचा असेल, तर मतदार यादीतील गोंधळ त्वरित संपवणे गरजेचे आहे.”

दरम्यान, विरोधकांनी निवडणूक आयोगावर तीव्र टीका करत बोगस मतदार आणि दुबार नोंदींचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाच्या पुढील भूमिकेकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. आज संध्याकाळी राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यास, या मतदार यादीच्या वादामुळे राज्यात आणखी एक राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे.