Why raining : पाऊस इतका मोकाट का सुटलाय? शेतकऱ्यांची अवस्था बिकट !

Heavy rains lashed the country including Maharashtra : महाराष्ट्रासह देशभरात मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा,

Mumbai : यंदाच्या पावसाळ्यात निसर्गाने रौद्र रूप धारण केले आहे. महाराष्ट्रापुरताच नव्हे तर देशभरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. जम्मू- काश्मीरपासून ते पश्चिम बंगालपर्यंत आणि गुजरातपासून ते दक्षिण भारतापर्यंत पावसाने धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागात तर “पाऊस मोकाट सुटलाय” अशी वाक्यं सहज ऐकू येत आहेत. सलग दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली असून खरीपाचे मोठे नुकसान झाले आहे.

मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागांना पावसाने झोडपून काढले आहे. नदीनाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागल्याने अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठच्या जमिनी गिळंकृत झाल्या असून लाखो हेक्टरवरील पिकं खरडून गेली आहेत. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद यांसह अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतं अक्षरशः तलाव बनली आहेत. अनेक गावांमध्ये घरं, शाळा पाण्याखाली गेली असून वीज पडल्याने अनेकांचा बळी गेला आहे. गुरं-ढोरं वाहून गेल्याने पशुधनाचेही नुकसान झाले आहे. काही ठिकाणी आपत्कालीन पथक तर काही भागांत लष्कराच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.

Local body election : निवडणूक खर्च मर्यादा ९ वर्षांपासून आहे तेवढीच !

हवामान तज्ञांच्या मते, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन ही या मुसळधार पावसामागची मोठी कारणं आहेत. धाराशिव, बीड, जालना, नांदेड या जिल्ह्यांत तर गेल्या २५ वर्षांत झाला नव्हता इतका पाऊस यंदा कोसळला आहे. बुलढाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला. तर वाशिम, अकोला, अमरावतीसह पश्चिम महाराष्ट्रातही परतीच्या पावसाने थैमान घातले.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जवळपास ७० लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतीला सर्वाधिक फटका बसला असून अनेक ठिकाणी जमीनच वाहून गेली आहे. शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

सरकारकडून पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले असून नुकसानभरपाई दिली जात आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असे कृषीमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. “हे निसर्गाचं संकट आहे, पण सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे,” असेही ते म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी जाहीर करण्यात आला आहे. नुकसानीच्या प्राथमिक आकडेवारीनुसार राज्यातील ३२ लाख शेतकऱ्यांना २,२१५ कोटींची मदत मंजूर झाली आहे. ही रक्कम ३१.६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याशिवाय, जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १,३३९ कोटींची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे.

Rain alert : अस्मानी संकट आणखी गडद होण्याची शक्यता :

राज्यभरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे पंचनाम्यांचे काम कठीण झाले असले तरी सरकारकडून दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पावसाचा कहर थांबण्याची चिन्हं अजूनही दिसत नसल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.