We not in habit of running away, atmosphere is ours even before convention : पळून जाण्याची आमची सवय नाही, अधिवेशनाआधीच वातावरण तापले
Nagpur : सोमवार पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधीच सत्ता-विरोधकांमध्ये शब्दयुद्धाचा पारा चांगलाच चढला आहे. चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार, पत्रकार परिषदेतून आरोपांची झोड आणि सोशल मीडियावरील टोलेबाजी या साऱ्यांमुळे नागपूरचं राजकीय तापमान विदर्भाच्या थंडीतही तापले आहे.
चहापानावर विरोधकांचा बहिष्कार जाहीर होताच काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी सरकारवर शेतकरी, कायदा-व्यवस्था आणि प्रशासनातील भ्रष्टाचाराबाबत घणाघाती आरोपांची मालिका झाडली. “राज्यात शेतकरी हवालदिल असून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे…” असं म्हणत विरोधकांनी हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
Sudhir Mungantiwar : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘प्रतिहेक्टरी वीस हजार बोनस’ जाहीर करा !
मात्र काही तासांतच सरकारकडूनही पलटवार झाला आणि तोही नेमका फडणवीसांच्या शैलीत. “विरोधकांकडे बोलायला विषय नाहीत. निराशेने भरलेली पत्रकार परिषद होती. त्रागा जास्त, तथ्य कमी,” अशा शब्दांत फडणवीसांनी टीकाकारांचा समाचार घेतला. त्याहूनही एक पायरी पुढे जात त्यांनी खोचक टिप्पणी केली “काँग्रेस पक्ष प्रामाणिक होता अशी उपरती भास्कर जाधव यांना झाली. आणि विरोधकांना पत्रावर सह्या करायला कोणी भेटत नव्हतं हे तर अल्टिमेट!”
विदर्भावर वडेट्टीवारांच्या विधानांवरही फडणवीसांनी प्रतिहल्ला चढवला “2014 पूर्वीचा आणि 2014 नंतरचा विदर्भ बघावा. बदल दिसेल. वर्षानुवर्षे दुर्लक्षित झालेल्या गोष्टींमध्ये आमच्या सरकारने गती आणली आहे.” अधिवेशन कमी दिवसांचं असल्याने सत्ताधारी पळ काढतेय, असा आरोप विरोधकांनी केला असताना फडणवीसांनी त्यालाही ठळक उत्तर दिलं “शनिवार-रविवारीही अधिवेशन होणार आहे. पळून जाण्याची मानसिकता आमची नाही. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सभागृहात देऊ, प्रत्येक प्रश्नांचे उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत.”
Winter Session : सरकार अपयशाची कुंडली घेऊन अधिवेशनात आले आहे!
विरोधी पक्षनेता निवडीच्या प्रश्नावर मात्र सरकारने पाय मागे घेतले “तो निर्णय सभापती आणि अध्यक्ष यांच्याकडे आहे. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य,” एवढंच सांगून फडणवीसांनी राजकीय बॉल विरोधकांच्या कोर्टात ढकलला.
एकंदरीत, अधिवेशन सुरू होण्याआधीच दोन्ही सत्ताधारी आणि विरोधक तुफान तयारीत आहेत. आरोप-प्रत्यारोप, खोचक टोमणे आणि राजकीय रणनीतींचा खेळ रंगण्याची 100% चिन्हं दिसत आहेत. नागपूरमध्ये थंडी वाढत असताना विधानभवनात मात्र तापमान 50 डिग्रीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.








