The Education Department said that administrative approval has been received for the construction : बांधकामासाठी प्रशाकीय मान्यता मिळाली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले
Wardha : जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या प्राथमिक शाळांचे रूपडे पालटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन समितीतून नियोजन करण्यात आले आहे. यात वर्गखोली दुरुस्ती, वर्गखोली बांधकाम, स्वच्छतागृह निर्मिती आदी कामे करण्यात येणार आहेत. यात ५१ शाळांच्या दुरुस्तीच्या कामांसह ११ वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.
४२ शाळांच्या बांधकामासाठी प्रशाकीय मान्यता मिळाली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या इमारतीची स्थिती बिकट आहे. त्यामुळे काही पालकांनी प्राथमिक शाळांऐवजी खासगी शाळांमध्येच विद्यार्थ्यांना पाठवणे पसंत केले. यामुळे प्राथमिक शाळांमधील पटसंख्या कमालीची घटत चालली आहे. त्याचा परिणाम शाळा बंद करण्यापर्यंत झाला आहे. काही शाळांना विद्यार्थ्यांअभावी कुलूप ठोकण्यात आले आहे.
शाळांतील पटसंख्या टिकून राहावी यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. भौतिक सुविधा पुरविण्याबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षणावरही भर देण्यात येत आहे. सन २०२४-२५ च्या जिल्हा नियोजन मधून शाळा दुरुस्तीसाठी तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्या निधीतून जिल्ह्यातील ५१ शाळांची दुरुस्ती होणार आहे. शिवाय रंगकाम आणि टाइल्स बसविल्या जाणार आहेत. याची जबाबदारी जिपच्या बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. मार्च २०२६ पर्यंत शाळांची दुरुस्ती होणार आहे.
Zilla Parishad School : कमी पटसंख्यांच्या शाळांवर टांगती तलवार !
जिल्ह्यातील चार तालुक्यांतील शाळांत नव्याने ११ वर्गखोल्यांचे बांधकाम होणार आहे. यासाठी १० कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. एका वर्गखोलीसाठी १८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने शाळेत येणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यातील ४४ प्राथमिक शाळांमध्ये दिव्यांग स्वच्छतागृहे नव्याने निर्माण केली जाणार आहे. यासाठी नियोजन झाले असून, बांधकाम विभागाकडे काम पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल, यावर भर देण्यात आला आहे. शाळांच्या दुरुस्तीसह वर्गखोली बांधकाम , स्वच्छतागृहाची निर्मिती केली जाणार आहे. मार्च २०२६ पर्यंत ही कामे पूर्ण केली जाणार आहे, असे सांगण्यात आले आहे.,