Nagpur’s cultural heritage will get a new direction, Devendra Fadnavis is confident : नागपूरच्या सांस्कृतिक वारसाला मिळणार नवी दिशा, देवेंद्र फडणवीसांना विश्वास
Nagpur : नागपूरच्या ओळखीत मध्यवर्ती स्थान असलेल्या आणि देशाचा झिरो माईल असलेल्या स्मारकाच्या सर्वांगीण विकासाला आता केंद्र सरकारचीही साथ मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने या प्रकल्पासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती समन्वयक म्हणून केली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातून केंद्राकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देत विभागाचे सचिव अभय करंदीकर यांनी फडणवीस यांना पत्राद्वारे कळवले की केंद्र सरकार झिरो माईल विकास उपक्रमात पूर्ण सहकार्य करेल. नागपूर महानगरपालिका या ठिकाणी नूतनीकरण, आधुनिकीकरण आणि सांस्कृतिक विकासाची कामे करत आहे. हा प्रकल्प नागपूरच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक वारशासाठी महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Local Body Elections : चाचपणी अंतिम टप्प्यात, 17 नोव्हेंबरला स्पष्ट होणार महायुतीचे चित्र !
या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्राने अतिरिक्त सर्वेयर जनरल संदीप श्रीवास्तव यांची नोडल अधिकारी म्हणून तर सर्वे ऑफ इंडिया पुणेचे संचालक ए.के. सिंह यांची सहाय्यक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. हे दोन्ही अधिकारी राज्य सरकार, नागपूर महानगरपालिका आणि केंद्रातील विभागांमध्ये समन्वय साधून झिरो माईल विकास प्रकल्पाला गती देतील.
झिरो माइल हा भारताचा भौगोलिक केंद्रबिंदू मानला जातो. याचे ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे केवळ नागपूरच्या वारसा आणि संस्कृतीच्या ओळखीतच भर पडणार नाही तर शहरातील पर्यटन आणि नागरी विकासालाही चालना मिळणार आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या या सहकार्यामुळे झिरो माइल परिसर जागतिक दर्जाच्या वारसा स्थळाप्रमाणे विकसित होईल. नागपूरचा वारसा, पर्यटन आणि संस्कृती यांना नवा आयाम मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
Removal from spokesperson: अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी !
झिरो माइलचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रकल्प नसून नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम साकार झाला, तर नागपूर स्मार्ट सिटीसह कल्चरल सिटीचेही नवे मॉडेल ठरेल, अशी अपेक्षा नागपूरकरांकडून व्यक्त केली जात आहे.








