Independent women candidate angry zero vote raise serious questions on EVM : अपक्ष महिला उमेदवार संतप्त, शून्य मतदानाने ईव्हीएमवर गंभीर प्रश्न
Mumbai : महानगरपालिका निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव प्रभाग क्रमांक १-अ मधील अपक्ष महिला उमेदवार सुनंदा भागवत फेगडे यांना मिळालेले शून्य मतदान हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्वतः उमेदवार असूनही आणि प्रत्यक्ष मतदान केल्याचा दावा करत असताना निकालात एकही मत नोंदले न जाणे, ही बाब केवळ संशयास्पद नसून लोकशाही प्रक्रियेवर घाला घालणारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“माझ्या घरात १४ मतदार आहेत, त्यांची मतं जाऊ द्या, पण मी स्वतः मला मत दिलं होतं, ते मत कुठे गेलं?” असा थेट सवाल करत फेगडे यांनी निवडणूक यंत्रणेवर रोष व्यक्त केला आहे. मतदान यंत्रणा सुरक्षित असल्याचे दावे वारंवार निवडणूक आयोगाकडून केले जात असले, तरी प्रत्यक्ष निकालात उमेदवारालाच शून्य मते मिळणे ही बाब सामान्य कशी काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकार केवळ एका उमेदवारापुरता मर्यादित नसून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
Akola Congress : संशयित म्हणून नाव आले आणि पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला
ईव्हीएममध्ये छेडछाड अशक्य असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोग वेळोवेळी देत असतो, मात्र प्रत्यक्षात असे प्रकार घडत असतील तर त्याचे उत्तर कोण देणार, असा सवाल उपस्थित होत आहे. मतदार बटण दाबतो, निकाल मशीन ठरवते आणि प्रश्न विचारला की स्पष्टीकरण मात्र सत्ताधारी पक्षाकडून येते, ही आजची लोकशाहीची स्थिती असल्याची तीव्र टीका फेगडे यांनी केली आहे. ईव्हीएम सरकारी असते, निवडणूक आयोग घटनात्मक असतो, पण उत्तर मात्र पक्षीय पातळीवरून दिले जाते, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या घटनेनंतर बामसेफ बहुजन क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनीही, देशभर ईव्हीएममध्ये गडबड होत असल्याचा आरोप केला आहे. जळगावमधील हा प्रकार म्हणजे ईव्हीएमविरोधातील संशयाला बळ देणारा ठोस पुरावा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Amravati Municipal Council : अमरावती मनपात स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढली
आज ईव्हीएमवर प्रश्न विचारणं म्हणजे लोकशाहीवर संशय घेण्याचा गुन्हा ठरत असल्याची भावना उमेदवारांमध्ये निर्माण होत आहे. “मी मला मत दिलं होतं, ते मत दिसत नाही. मग ते मत अवैध होतं का, की मतदाराचाच कौल आता महत्वाचा उरलेला नाही?” असा संतप्त सवाल करत सुनंदा फेगडे यांनी संपूर्ण निवडणूक व्यवस्थेवरच बोट ठेवले आहे. या प्रकरणामुळे जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकांवर आणि एकूणच ईव्हीएम प्रणालीवर पुन्हा संशयाचे ढग दाटले असून, या घटनेचे स्पष्टीकरण कोण देणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.








