ZP election : वाद्य-फटाक्यांना फाटा, घरोघरी जाऊन साध्या पद्धतीने प्रचाराचे आवाहन

Impact of Ajit Pawar death on Zilla Parishad elections Campaigning in peace : अजित पवारांच्या निधनाचा जिल्हा परिषद निवडणुकांवर परिणाम शांततेत प्रचार

Mumbai: सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाचा परिणाम थेट सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर दिसून येत आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत असतानाच घडलेल्या या दुर्घटनेमुळे निवडणूक प्रचाराची दिशा आणि पद्धतच बदलल्याचे चित्र राज्यभर उमटले आहे.

जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी बारामतीकडे येत असताना अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि या भीषण दुर्घटनेत त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नागरिकांनाही मोठा धक्का बसला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व स्तरांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुःखवटा पाळण्यात आला.

या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात राजकीय वातावरण विशेषतः भावनिक झाले आहे. दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येऊन महाआघाडीचा नवा प्रयोग साकारलेल्या बार्शीत निवडणूक प्रचार सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. त्यामुळे एकमेकांविरोधात निवडणूक लढवत असलेले आजी-माजी आमदारही एकाच सुरात प्रचाराची पद्धत बदलण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.

Maharashtra Budget : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाआधी खर्चकपातीचा निर्णय

बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांनी स्वतंत्रपणे प्रतिक्रिया देत अजित पवार यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, बार्शीच्या विकासासाठी त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांच्याबद्दलच्या आठवणी व्यक्त केल्या. प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच अशी घटना घडल्याने निवडणूक लढवताना संवेदनशीलता जपण्याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला आहे.

आमदार दिलीप सोपल यांनी महाआघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवारांना आवाहन करत प्रचारादरम्यान कोणतेही वाद्य, बँड, हलगी किंवा फटाकेबाजी करू नये, तर केवळ वैयक्तिक गाठीभेटींवर भर द्यावा, असे स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या जाण्याने भरून न निघणारे नुकसान झाले असून त्या भावनेचे भान ठेवूनच प्रचार करावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.

त्याचप्रमाणे भाजप नेते राजेंद्र राऊत यांनीही आपल्या पक्षाच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना साध्या पद्धतीने प्रचार करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रचाराचा शुभारंभ अत्यंत संयमित स्वरूपात करावा, वाद्यवादन किंवा आतषबाजी टाळावी आणि पदयात्रांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रचार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Plane crash investigation : बारामतीतील धक्कादायक विमान अपघाताची अखेर चौकशी सुरू!

विशेष म्हणजे, जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री बार्शीत येणार असल्याची चर्चा होती. मात्र, या दुर्घटनेनंतर या तिन्ही नेत्यांचे बार्शीतील प्रचार दौरे रद्द होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांमध्येही बदल करण्यात आला आहे. मतदानाची तारीख ५ ऐवजी ७ करण्यात आली असून मतमोजणी ७ ऐवजी ९ तारखेला होणार आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे निवडणूक प्रचाराचा उत्सवी आणि आक्रमक स्वर बदलून तो अधिक शांत, संयमित आणि भावनिक झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.