आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मात्र प्रश्नांवर मौन
Gadchiroli : जनजातीय गौरव दिनाच्या देशस्तरीय मुख्य शासकीय सोहळ्याचे यजमानपद यंदा गडचिरोली जिल्ह्याला मिळाले आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि भाजपकडून या कार्यक्रमाला विशेष महत्त्व दिले जात असताना, प्रत्यक्ष तयारीपेक्षा राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीचीच अधिक चर्चा रंगली आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी पत्रकार परिषद घेऊन सोहळ्याच्या तयारीची माहिती दिली; मात्र जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी बगल दिल्याने पत्रकारांमध्ये राजकीय चर्चेला वेगळे वळण मिळाले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान गडचिरोलीत राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुख्य शासकीय सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंत्री उईके यांनी जिल्हा क्रीडा संकुलाला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.
मात्र, यापूर्वी समाजकल्याण विभागाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत वेगळेच चित्र पाहायला मिळाले. आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती असताना भाजपचे पदाधिकारी आणि स्थानिक राजकीय नेत्यांची मंचावर मोठी गर्दी होती. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधल्यानंतर संबंधित अधिकारी कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त असल्याचे स्पष्टीकरण मंत्र्यांनी दिले. त्यामुळे शासकीय कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत प्रशासकीय यंत्रणेपेक्षा राजकीय उपस्थितीच अधिक ठळक असल्याची चर्चा सुरू झाली.
कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती देताना मंत्र्यांनी सांस्कृतिक महोत्सव, मान्यवरांची उपस्थिती आणि विविध उपक्रमांचा तपशील मांडला. मात्र, धानखरेदीतील अडचणी, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे प्रलंबित प्रश्न तसेच वादग्रस्त आयएएस अधिकारी शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळातील कथित गैरव्यवहार प्रकरणातील रखडलेल्या कारवाईबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांवर मंत्री उईके यांनी ठोस उत्तर देणे टाळले.
आदिवासी समाजासाठी या सोहळ्यात काही विशेष घोषणा होणार आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही मंत्र्यांनी केवळ स्मितहास्य करत हात जोडले आणि पत्रकार परिषदेचा समारोप केला. त्यामुळे कोट्यवधींच्या आयोजनातून आदिवासी जनतेच्या पदरात नेमके काय पडणार, हा प्रश्न अनुत्तरित राहिला.
१४ नोव्हेंबर रोजी ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते होणार असून केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर १५ नोव्हेंबरच्या मुख्य सोहळ्याला राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय तसेच सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय कातकरी, कोलाम, माडिया आणि पारधी समाजातील नागरिकांसाठी विविध शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प स्तरावरही कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
एकीकडे पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे गडचिरोलीतील सोहळ्याला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे, तर दुसरीकडे स्थानिक आदिवासींचे प्रश्न, धानखरेदी आणि प्रशासकीय कारवाई याबाबत सरकारची भूमिका काय, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भव्य सोहळ्याच्या तयारीत भाजपच्या राजकीय उपस्थितीचे प्रदर्शन ठळक होत असताना, आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांवर मंत्री उईके यांनी मौन का बाळगले, असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
___








