व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गडचिरोलीत राज्यस्तरीय सोहळ्याची तयारी; भाजपकडूनही सेवा सप्ताहाचे आयोजन

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गडचिरोलीत राज्यस्तरीय सोहळ्याची तयारी; भाजपकडूनही सेवा सप्ताहाचे आयोजन

 

१५ नोव्हेंबरला राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती; सामाजिक आणि जनहिताच्या उपक्रमांची मेजवानी

 

Gadchiroli : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने १५ नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिनाचा राज्यस्तरीय मुख्य शासकीय सोहळा गडचिरोली येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याने जिल्ह्यात प्रशासकीय स्तरावर तयारीला वेग आला आहे.

या सोहळ्यात आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी सेवक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच गेल्या १२ वर्षांत आदिवासी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म पुरस्काराने सन्मानित मान्यवरांचाही गौरव केला जाणार आहे. राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडे या संपूर्ण उपक्रमाची नोडल जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दिवाळीच्या शुभेच्छांच्या आडून निवडणुकीचे राजकारण तापले! इच्छुकांची मोर्चेबांधणी

दरम्यान, भारतीय जनता पक्षानेही या सप्ताहाला सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची जोड दिली आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सप्ताहातील कार्यक्रमांची माहिती दिली. सप्ताहांतर्गत १३ नोव्हेंबर रोजी पीएम जनमन योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ आणि धनादेश वितरित केले जाणार आहेत. १४ नोव्हेंबरला महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता, दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१६ नोव्हेंबरला आधारकार्ड दुरुस्ती, शासकीय कागदपत्रे आणि वनपट्टेधारकांसाठी विशेष सेवा शिबिर भरविण्यात येणार आहे. १७ नोव्हेंबरला आरोग्य व पोषण जनजागृतीसह विशेष सिकलसेल तपासणी शिबिर आयोजित केले जाणार आहे. तर १८ नोव्हेंबरला महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन करून सप्ताहाचा समारोप होणार आहे.

वडेट्टीवारांचा दिवाळी फराळातून गोडवा वाढविण्याचा प्रयत्न; काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण कायम!

या सप्ताहात विविध ठिकाणी शोभायात्रा, आदिवासी लोककला प्रदर्शने, क्रीडा स्पर्धा आणि जनजागृतीपर उपक्रमही राबविले जाणार आहेत. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा जागर करण्यासोबतच आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वैभव आणि योगदान अधोरेखित करण्याचा या उपक्रमांचा उद्देश आहे.

पत्रकार परिषदेला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, डॉ. नामदेव उसेंडी, कृष्णा गजबे, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, ज्येष्ठ नेते प्रमोद पिपरे आणि प्रकाश गेडाम आदी उपस्थित होते.

 

error: Content is protected !!