Fourth day of protest, tension increases everywhere : आंदोलनाचा चौथा दिवस, सर्वत्र गर्दी तणाव वाढला
Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस असून जरांगे यांनी आता पाणी पण त्याग करून कडक उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली आहे. मुंबई पोलिसांनी काही अटींसह आंदोलनास आणखी एका दिवसाची परवानगी दिली असून संपूर्ण राज्याचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.
ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट घेऊनही त्यांनी नरमाईची भूमिका स्वीकारण्यास नकार दिला. “आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही,” असा त्यांचा स्पष्ट संदेश आहे. दरम्यान, काल रात्री झालेल्या वैद्यकीय तपासणीत जरांगेंचा रक्तदाब तपासण्यात आला. डॉक्टरांनी त्यांना पाणी पित राहण्याचा सल्ला दिला असला तरी आजपासून त्यांनी पाणी त्याग करण्याची भूमिका घेतली आहे.
Sharad Pawar : शरद पवार चारदा मुख्यमंत्री होते, तेव्हा लक्षात आलं नाही का?
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आज पुन्हा बैठक घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काल उशिरा झालेल्या बैठकीनंतर आरक्षण उपसमिती आज महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते. समिती कोणत्या मागण्या मान्य करायच्या यावर चर्चा करणार असून, त्यानंतर सरकारची भूमिका जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे.
आंदोलनाचा चौथ्या दिवशी असून मुंबईत वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. आझाद मैदानाकडे जाणाऱ्या गाड्यांचा ओघ वाढला असला तरी ईस्टर्न फ्री वेसह अनेक मार्ग खुले आहेत. सकाळी नेहमी दिसणारी कोंडी यावेळी टळली. मात्र, मुंबईच्या काही भागात आंदोलकांच्या वाहनांमुळे कोंडी होत आहे. रेल्वे स्थानक आणि रस्त्यावर आंदोलकांची गर्दी दिसत आहे.
Maratha movement : कायद्याच्या चौकटीतच मराठा आरक्षणाचा निर्णय होणार !
आरक्षणाच्या समर्थनार्थ मराठवाड्यातून आलेल्या अनेक मराठा बांधवांनी चर्चगेट स्थानकात रात्रीचा आश्रय घेतला. चटई टाकून स्थानकाच्या पॅसेजमध्ये झोप घेतलेल्या आंदोलकांना गावाहून आणलेले जेवण पुरवले जात आहे. रेल्वे स्थानकावर ठाण मांडून हे बांधव आपली मागणी ठामपणे मांडत आहेत. पावसामुळे आंदोलनस्थळी चिखल तयार झाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना केल्या. बीएमसीच्या वाहनातून आणलेली खडी स्वयंसेवकांनी पसरवून आंदोलकांसाठी सोयीस्कर व्यवस्था केली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आता निर्णायक दिवस सुरू झाले आहेत. जरांगे यांच्या कडक उपोषणामुळे दबाव वाढला असून सरकार पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
____