Pieces of machinery including the company fell 500 meters : कंपनीसह मशिनरीचे तुकडे 500 मीटरवर कोसळले
Nagpur : बाजारगावजवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत मध्यरात्री भीषण स्फोट होऊन एक कामगार ठार तर 17 कामगार जखमी झाले आहेत. मृत कामगाराचे नाव मयूर गणवीर असे असून चार जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
सीबी वन या प्लांटमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास स्फोट झाला. त्याआधी प्लांटमधून धूर निघत असल्याचे दिसताच अनेक कामगारांनी वेळेत बाहेर धाव घेतली. मात्र मयूर गणवीर यांना बाहेर पडता आले नाही आणि त्यातच स्फोट झाला. या भीषण स्फोटामुळे प्लांटच्या इमारतीचे तुकडे हवेत उडून 400 ते 500 मीटर अंतरावर जाऊन कोसळले. लोखंडी मशीनचे मोठमोठे तुकडे आणि काँक्रीटचे पिलर्स कंपनीच्या भिंती ओलांडून महामार्ग व शेतांमध्ये कोसळले.
Congress aggression : भाजपने मत चोरी करून 132 आमदार निवडून आणले !
स्फोटानंतर पोलीस, अग्निशमन दल व प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने काही वेळ प्रतीक्षा करून कूलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आणि मलब्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.
या स्फोटात कैलास वर्मा, मनीष वर्मा, सनी कुमार, अरुण कुमार, अतुल मडावी, सौरभ डोंगरे, तेजस बांधते, सुरज गुटके, अखिल बावणे आणि धर्मपाल मनोहर हे जखमी झाले आहेत. वेळेवर बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
Maratha Reservation : मराठा आरक्षण : तह, संघर्ष आणि नवा पेच!
स्फोटामुळे कंपनीच्या बफर झोनमधील सौर पॅनल्सचे मोठे नुकसान झाले आहे. काँक्रीटचे तुकडे, पिलर्स आणि लोखंडी मशीनचे अवजड तुकडे महामार्ग ओलांडून शेतात पडले असून अपघाताच्या वेळी महामार्गावरून कोणतेही वाहन जात नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या कंपनीत यापूर्वीही 17 डिसेंबर 2023 रोजी मोठा स्फोट होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.