Reservation control : हे गरिबी हटाव नाही… आरक्षणावरून राष्ट्रवादीत वाद !

Chhagan Bhujbal opposes Ajit Pawars stance : अजित पवारांच्या भूमिकेला छगन भुजबळांचा विरोध

Mumbai : महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा गाजत असून, आता हा वाद थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातच पेटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याला मंत्री छगन भुजबळ यांनी थेट विरोध दर्शवला आहे. नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या चिंतन शिबिरानंतरही हा वाद मिटण्याऐवजी अधिकच तीव्र होत असल्याचे दिसत आहे.

महायुती सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणासंदर्भात जीआर काढला होता. तेव्हापासूनच छगन भुजबळ नाराज असून, त्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. राज्य सरकारचा आदेश अन्यायकारक असल्याचा आरोप करीत, प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. भुजबळ यांनी थेट बॅकडोअरने मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात प्रवेश सुरू असल्याचा आरोप केला आहे.

MSRTC : दिवाळीच्या तोंडावर एसटीची चाके थांबणार?

याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी काल मोठे विधान केले. “ज्याला त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण हवे असेल, त्याला ते मिळाले पाहिजे. जातीच्या चौकटीत न अडकता, मी माणसाला मदत करतो. काही लोक जातीचे वेड लावून समाजात तेढ निर्माण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य उभारले होते,” असे अजित पवार म्हणाले.

अजितदादांच्या या भूमिकेला छगन भुजबळांनी कडाडून विरोध केला. “आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. मराठा ही एक जात आहे, तर ओबीसी हा प्रवर्ग असून त्यात अनेक जातींचा समावेश आहे. या समाजासाठीच आरक्षणाची तरतूद आहे. ओबीसी सामाजिकदृष्ट्या मागास आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या आधार घेऊन आरक्षण देण्याला आमचा तीव्र विरोध आहे,” असे भुजबळांनी स्पष्ट केले.

यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरून छगन भुजबळ केवळ महायुती सरकारवरच नाही तर आपल्या पक्षातही नाराजी व्यक्त करत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी लातूर दौऱ्यातून आणि नागपूर येथील ओबीसी नेत्यांच्या बैठकीतून आंदोलनाची नवी चळवळ सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

Banjara community : ‘एक गोर, सव्वा लाखेर जोर’, बंजारा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर

आरक्षणाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा विरोधाभास आगामी काळात महत्त्वाचे राजकीय वादळ निर्माण करू शकते, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा रंगू लागली आहे.