Chief Minister will give a detailed proposal to the Center. : केंद्राला सविस्तर प्रस्ताव देणार मुख्यमंत्र्यांनी भूमिका
Mumbai : राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तब्बल एक तास झालेल्या या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात सविस्तर माहिती दिली आणि केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात मदतीची मागणी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर दिल्ली गाठली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मोठ्या फाईलसह महाराष्ट्रातील परिस्थिती मांडली. यावेळी मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान, जनावरे वाहून जाणे आणि मानवी जीवितहानी झाल्याचं त्यांनी सांगितलं.
पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मी मुख्यमंत्री म्हणून आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिलं आहे. तसेच, महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान स्पष्ट केलं असून, एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदतीची मागणी केली आहे.”
यावर पंतप्रधान मोदींनी सकारात्मक प्रतिसाद देत, “प्रस्ताव तातडीने पाठवा, आम्ही त्यावर त्वरीत कार्यवाही करू,” असं आश्वासन दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
सध्या राज्यभरातील नुकसानीचा तपशील गोळा करण्याचं काम सुरू असून, संपूर्ण आकडेवारी आल्यानंतरच अंतिम अंदाज सांगता येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमाफीसंदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांनी स्पष्ट केलं की, “कर्जमाफी वारंवार करता येत नाही. समिती त्यावर अभ्यास करत आहे. पण शेतकऱ्यांना तातडीची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.








